गावचं जगणं भावलं!

>> वैभव मांगले (अभिनेता)

माझा काळ फारच छान होता याचे कारण मी लॉकडाऊनच्या दोन दिवस आधी गावी गेलो आणि आम्ही गावी राहण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जिह्यातील कासारकोळवण हे माझे गाव आहे आणि तिथे आम्ही जवळपास बावीस ते पंचवीस लोक रोज असायचो. परिस्थिती गावातलीच होती. कारण संपूर्ण घरात दोन-तीनच पंखे होते. एसी नव्हता, खाली झोपायला गाद्या नव्हत्या, खाली शेणाने सारवलेली जमीन होती. गावात असणाऱया गोष्टी होत्या आणि मला वाटतं, माझ्यापेक्षा माझ्या मुलांनी त्याचा जास्त आनंद घेतला. मुलांचे उन्हात फिरणे असेल, जंगलात फिरणे असेल, वन भोजन असेल, जे त्यांच्या सोबत मी केले. नदीमध्ये जाऊन डुबक्या मारणं, निसर्ग नाना पद्धतीने पाहणे, गाई-गुरं, शेण, गाईचं आमच्या विणं असेल, तिला बाळ होणं असेल, खरवस खाणं, माझी चित्रकला, सगळ्या मुलांबरोबर खेळणं, वाट्टेल ते खाणं, जी मुलं आठवडय़ातून एकदा-दोनदा पिझ्झा- बर्गर मागत होती, हॉटेलिंग करायला मागत होती, ती मुलं भाजीभाकरी, वरणभात, पिठलंभाकरी आनंदाने खात होती, दिवसभर खेळून थकत होती आणि रात्री नऊ-साडेनऊला जे काही मिळेल, त्याच्यावर झोपत होती. त्यामुळे मला वाटतं, हे आयुष्य त्यांच्यासाठी सुंदर होतं आणि ते पाहणं, त्याचा आनंद घेणं माझ्यासाठी फार वेगळाच गमतीचा भाग होता, आणि ते सगळं फार छान होतं गावामध्ये राहणं. एरवी कोणी चार महिने जाऊन रहा असे म्हटले असते तर ते स्वीकारले असते का? नाही. त्यामुळे त्यानिमित्ताने हा काळ आमच्यासाठी उत्तमच होता आणि तो आम्ही आनंदात घालवला. वेगळं काय करता आलं, तर या सगळ्यात मुलांना चार महिने एक वेगळं आयुष्य जगायला मिळालं, पाहायला मिळालं. अभ्यास, शाळा यापलीकडे जाऊन त्यांनी ते एन्जॉय केलं आणि ते मला वाटतं त्यांच्या आयुष्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि ते माझ्यासाठीही महत्त्वाचं होतं. त्यातून नवीन दृष्टिकोन, नवीन जगण्याचा एक वेगळा पैलू आपण पाहत असतो आणि तो आपल्याला मिळतो. ही त्यातल्या त्यात मला आनंदाची गोष्ट वाटते.

शूटिंगला जाताना काळजी घेतोच. सध्या हिंदी सोनी टीव्हीवर ‘मेरे साई’ ही मालिका करतोय. तिथे प्रवेशद्वारावरच टेम्परेचर, ऑक्सिजन तपासले जाते. मास्क असतं, सॅनिटायझर दिले जाते, दर अर्ध्या तासाने सॅनिटायझर तुमच्याकडे येत असतो. ही सगळी काळजी घेत असतो. काळजी घेऊनच आम्ही शूटिंग करतो. मास्क फक्त फायनल टेकला काढतो. घरी आल्यानंतर कुठेही स्पर्श न करता आंघोळ करतो. मला वाटतं, जगण्यासाठी विशेष काही लागत नाही. विशिष्ट प्रकारचं अन्न जे तुम्ही खाता, जे तुम्हाला दोन्ही वेळा मिळालं तर तुम्हाला काहीही लागत नाही आयुष्यात. बाकीच्या ज्या गोष्टी मोबाईल, गाडी, घर, कपाट या सगळ्या जगाने लादलेल्या गोष्टी आहेत. मी हा ब्रॅण्ड नाही वापरला तर लोकांना काय वाटेल आणि वापरला तर लोकांच्या नजरेत माझी किंमत जास्त ठरेल हा जो मुळात मनात एक भाव आहे, तो माझ्या मते लोकांच्या मनातला कमी झालेला असेल. माझा तरी कमी झाला आहे. यापुढे मी ठरवलंय कपडा चांगला असला, रंग टिकाऊ असेल, आपल्याला शोभणारा कपडा असेल तर तो आपण घालावा. तो कुठल्या ब्रॅण्डचा आहे हे पाहत बसू नये. कारण आयुष्यात आपण तो कपडा साधारण सात ते आठ वेळाच घालतो. कारण एकदा तो कपडा एका समारंभात घातला तर लोक म्हणतील, ‘‘अरे, हा मागच्या समारंभातही घातला होतास ना! आता परत कसा घातलास?’’ या सगळ्यामध्ये सगळं आयुष्य अडकलेले आहे असे मला वाटते आणि त्याच्यामुळेच विवंचना, अधिक पैसे कमावणे या सगळ्या गोष्टीत आपण अडकून पडलेले आहोत. कोरोनामध्ये आपण हेच शिकलो की, घरात अडकून पडल्यावर पैसा, ब्रॅण्ड काय कामाचे आहेत? तर या सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत आणि लोकांनी त्यातून शहाणपण घ्यावे असे मला वाटते.

सध्या ‘मेरे साई’ नावाची मालिका हिंदी सोनीला मी करतोय. अजून एक प्रोजेक्ट आहे, जो लवकर येईल. नाटक जेव्हा कधी सुरू होईल, ते सुरू झाल्यावर शनिवार, रविवार त्याचे प्रयोग सुरू करू. कारण ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘इब्लिस’ ही दोन नाटकं माझी चालू आहेत. वेब सीरिजची एक-दोन ठिकाणी बोलणी सुरू आहेत. कसं होतंय ते बघायचं, पण तूर्तास काम सुरू होईल असे ठळकपणे सांगण्यासारखी परिस्थिती नाही आणि जे सुरू होणाराय त्याची कुठे वाच्यता करायची नाही. त्यामुळे स्पष्ट असे काही आता सांगता येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या