शिवमंदिरांच्या राज्यात – सारस्वतांचं अधिष्ठान, वालुकेश्वर

625

>> नीती मेहेंदळे

अवाढव्य पसरलेल्या मुंबई महानगरीत वास्तू आपलं पुरातन नावलौकिक सांभाळून आहेत. दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर-बाणगंगा मंदिर पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांना नेहमीच खुणावत असते.

इ.स. 1100 च्या पूर्वार्धातला काळ असेल तो. एक सारस्वत तरतरीत नाकेला तरुण बाणगंगा आणि एका जीर्ण शिवालयापाशी उभा होता. मागे पश्चिम दिशा अस्ताव्यस्त पसरलेली मुंबईचा लाडका समुद्र घेऊन. उसळता दर्या खडकावर लाटा आणून सोडत होता अव्याहत. सारस्वतांचं तेव्हाही मुंबई आणि समुद्रकिनाऱयाशी तसंच घट्ट नातं असणार. या बाणगंगेचा इतिहास आख्यायिका बनून तरळत होता त्याच्या डोळय़ांपुढे. गौतम ऋषींचं हे मूळ आश्रमस्थान. वनवासातला राम सीतेच्या वियोगात शोकाकुल इथे आला होता. रामाला तहान लागली आणि लक्ष्मणाने जमिनीत बाण मारून हा जलस्रोत आणवला. म्हणून ही बाणगंगा. मग गौतमांच्या सूचनेनुसार रामाने वाळूचंच शिवलिंग स्थापन केलं. तेच हे वालुकेश्वर… वाळकेश्वर. असं सगळं ऐकलेलं मनात साठवत तो तरुण आता थोडा चढ चढून वर आला आणि त्या परिसराचं प्रेमाने अवलोकन करू लागला. समोर खडकाळ समुद्रकिनारा, पश्चिमेचं सूर्यदर्शन, त्याकाठच्या या मंदिराच्या आणि लहानशा जलाशयाच्या तो प्रेमातच पडला. भराभर काही योजना त्याच्या डोक्यात तयार झाल्या. शिलाहारांचं राज्य असण्याचे ते युग आणि ठाणे (पूर्वीचं श्रीस्थानक) येथील शिलाहारांचं (इ. स. 810 ते 1260) शिवप्रेम सर्वश्रुतच होतं. हा सारस्वत तरुण त्यांच्या दरबारातला एक सरदार लक्ष्मण प्रभू. भराभर योजना तयार झाल्या आणि हुकूम निघाले. बघता बघता वालुकेश्वराचं सुंदर शिवालय बाणगंगेकाठी उभं राहिलं. बाणगंगेचा एक आयताकृती घाटदार पायऱयांनी सजलेला लक्षणीय तलावही त्यांनी बांधून काढला. याविषयी वालुकेश्वराच्या देवळात बाहेरच्या पडवीतच एक संस्कृतमधे पद्यात बांधलेला लेख सापडतो.

शिलाहारांनी या मंदिर व तलावासोबत अजूनही काही सुंदर शिवालयं व इतर मंदिरं या परिसरात चारही दिशांना उभारली. यात पश्चिमेला रामेश्वर, ओंकारेश्वर, दक्षिणेला जबरेश्वर, उत्तरेला सिद्धेश्वर आणि पूर्वेला परशुराम मंदिर तसेच विठ्ठल रुक्मिणी आणि गणपती मंदिरं आजही त्या जुन्या खुणा अंगावर सांभाळत तिथे ठाम उभी आहेत.

इसवी सन 1127 मधे लक्ष्मण प्रभू या सारस्वत ब्राह्म्मणाने वालुकेश्वर (आजचं वाळकेश्वर) मंदिर शिलाहारांच्या राजवटीत बांधले. पुढे 15व्या शतकात पोर्तुगीज आक्रमणांमध्ये या सर्वच मंदिरांची नासधूस व विटंबना झाली. पण 1715 मधे राम कामत या सारस्वताने पुन्हा या मंदिरांचा जीर्णोद्धार केल्याची नोंद मिळते. याच दरम्यान इथे बाणगंगेच्या उत्तर तीरावर सारस्वतांच्या कवळे मठ आणि पश्चिम तीरावर श्री काशीमठाची पुनर्स्थापना झाली. सारस्वतांचं वास्तव्य दहाव्या शतकाच्या आधीपासून या परिसरात असल्याचे दाखले मिळालेत. कवळे मठाजवळ काही होऊन गेलेल्या मठाधिपतींच्या महत्त्वाच्या समाध्या आजही दिसतात.

पूर्वी वालुकेश्वरासोबत विसेक लहानमोठी मंदिरं या प्रांगणात होती असा दावा केला जातो. तसेच पन्नास धर्मशाळाही बांधल्या होत्या अशी माहिती इथे मिळते. पण आज त्यातली मोजकीच मंदिरं व धर्मशाळा अस्तित्वात आहेत जी सारस्वत ट्रस्ट सांभाळते आहे. जबरेश्वराचं देऊळ आत पाय ठेवताच पुष्कळ जुनं असल्याचं त्याच्या बांधणीवरून व ललाटपट्टीवरून समजते. संपूर्ण दगडी बांधकाम अजून तरी भक्कम शाबूत राहिलेलं असलं तरी शेजारच्या इमारतींच्या अतिक्रमणाच्या विळख्यात कसा टिकाव धरेल याचा भरवसा वाटत नाही.

सारस्वतांचं वालुकेश्वर हे मुंबईतलं पूर्वापार दैवत मानलं जातं. दरवर्षी श्रावणात नागपंचमीनंतर इथे 7 दिवस उत्सव असतो. तेव्हा संपूर्ण मंदिर परिसर रोषणाई व सांस्कृतिक कार्यक्रमांनी झगमगत असतो. दक्षिण मुंबईतला हा मलबार हिलचा हा सर्वात उंच भाग तसा उच्चभ्रू आणि शांत. मंदिर परिसराला भेट देण्यासाठी मलबार टेकडीचा भाग उतरायला दक्षिण व उत्तरेच्या बाजूने पायऱया बांधल्या आहेत. दक्षिणेकडून उतरताना प्रथम जबरेश्वर व उत्तरेकडून सिद्धेश्वर मंदिर लागते. रस्त्यात 1700 नंतर बांधलेले तरीही जुनेच व्यंकटेश बालाजी मंदिरही लागते. मधोमध मोठे सुरेख तळे व सुंदर घाट चारही बाजूंनी खरे तर अतिशय आकर्षक आहेत. ‘लागा चुनरी में दाग’सारख्या अनेक चित्रपटांची चित्रीकरणं इथे झाली आहेत. तलावाकाठी तर्पण आदी विधी होतात. त्यामुळे व एकंदर वर्दळीमुळे तलाव परिसराची अवस्था आज मात्र बिकट आहे. पर्यटकांचा व भाविकांचा विचार करता वस्तुस्थितीत स्वच्छतेची अत्यंत आवश्यकता आहे. अनेक देश-विदेशच्या चित्रकार व छायाचित्रकारांना या मंदिरांची कल्पक मांडणी आणि समुद्राचं सान्निध्य कायम प्रेमात पाडत आलं आहे. एडविन वीक्स या चित्रकाराची बाणगंगेची चित्रं तर प्रसिद्धच आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या