
मराठवाडय़ाच्या रंगभूमीचे चालते बोलते विद्यापीठ असा ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख आदराने केला जात असे ते ज्येष्ठ रंगकर्मी त्र्यंबक महाजन चिरंतनाच्या प्रवासाला गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास महाजन यांना लाभला होता. त्यांच्या निधनाने नाटय़ क्षेत्रातील स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा असलेला महत्त्वाचा दुवाच आता निखळला आहे. आयुष्यभर या तपस्वी नाटय़धर्मी कलावंत, लेखकाने रंगदेवतेची साधना केली. मराठवाडय़ाची रंगभूमी संपन्न करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मोलाचे कार्य करून ठेवले. बालरंगभूमी असो की दलित, कामगार रंगभूमी असो. त्या त्या क्षेत्रात त्यांनी लक्षणीय कार्य केले. आपल्या वैविध्यपूर्ण लेखनाने, दमदार सादरीकरणाने मराठवाडय़ाच्या रंगभूमीचे विश्व तब्बल सात दशके व्यापून टाकले.
संभाजीनगर जिल्हय़ातील सिंदोन गावचे रहिवासी असलेल्या महाजन यांना नाटय़कलेची आवड बालवयातच जी लागली, तिने आयुष्यभर साथ सोडली नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रारंभी संभाजीनगर शहरातील महाराष्ट्र हिंदी विद्यालयात हिंदीचे शिक्षक म्हणून नोकरी मिळाली, मुख्याध्यापकाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळल्यानंतर डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करण्याची संधी मिळाली, मात्र त्यांनी आवडीचे क्षेत्र असणाऱया रंगभूमीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. नंतरच्या काळात मराठवाडा विद्यापीठातून एम. ए., पुणे विद्यापीठातून हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी, नाटय़शास्त्र्ा विभागातील पदवी त्यांनी मिळवली. हिंदीच्या प्रचारासाठी त्यांनी हिंदी विद्यालयाची स्थापना केली. तेहतीस वर्षांच्या सेवाकाळात तीन वर्षे पदव्युत्तर अध्यापन आणि सात वर्षे मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र्ा विभागात त्यांनी कार्य केले. कमलाकर सोनटक्के विभागप्रमुख असल्याच्या काळात महाजनही शिक्षणासाठी सेवारत होते. अनेक नाटकांचे लेखक, अनेक नाटकांत दमदार भूमिका अशी पार्श्वभूमी त्यांच्या प्रवासाला होती. नाटय़क्षेत्र, दिंडी, मराठी भाषा अशा अनेक पातळय़ांवर काम करणारा नक्कीच हुशार विद्यार्थी असला पाहिजे. त्र्यंबक महाजन नावाची हुशार व्यक्ती ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी होती यातच सर्व आले. या महाविद्यालयाचे प्राचार्य म. भि. चिटणीस यांनी महाजन यांना सुरुवातीच्या काळात दिलेली लेखनप्रेरणा ही पुढील काळासाठी खूप काही देऊन गेली. गुरूंची प्रेरणा हाच आशीर्वाद समजून त्यांनीही साठ-सत्तरच्या दशकात अनेक उत्तम नाटकांचे लेखन केले. स्वातंत्र्योत्तर काळात महाजन बीएला असताना यांनी तत्कालीन राजकीय स्थितीवर आधारित ‘झुलते मनोरे’ लिहिले. ते मोठय़ा प्रमाणात गाजले. महाजन मिलिंद महाविद्यालयात असतानाच्या काळात प्राचार्य म. भि. चिटणीस लिखित ‘युगयात्रा’ या महत्त्वाच्या नाटकात भूमिका केली, ज्याचा प्रयोग नागपुरात दीक्षाभूमीवर झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमक्ष या नाटकात भूमिका करण्याची सुवर्णसंधी मिळाली. युगयात्रा सांस्कृतिक नाटकाचा परिघ मोठा होता. युगपुरुषाला लाखो जनसमुदायाच्या साक्षीने उभे करणे हे सोपे काम नव्हते. मात्र या नाटकाची म्हणा किंवा डॉ. आंबेडकर यांचा प्रभाव म्हणा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव महाजन यांच्या व्यक्तिमत्त्वावर आयुष्यभर कायम राहिला. त्यानंतर त्यांनी मराठी रंगभूमी असो की दलित रंगभूमी असो, त्याला वाहून घेतले. झुलते मनोरे, दीपस्तंभ, जावई बापू, वासूकाका ही त्यांनी लिहिलेली काही नाटकं 1950 ते 1960 च्या दशकात गाजली. काही नाटकांत भूमिकाही केल्या. श्रीनिवास धोंगडे दिग्दर्शित 1952 ते 1954 या काळात ‘कुलवधू’ नाटकात भूमिकाही केली. ‘गाढवाचं लग्न’ या लोकप्रिय वगनाटय़ाचा रीडिंग अनुवाद केला. ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लोकनाटय़ाचा विषय आणि आशय’ ‘दलित रंगमंच ः एक आयाम’ याविषयी त्यांनी महत्त्वाचे लेखन केले. पुण्यात झालेल्या 63 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील एका परिसंवादात दलित रंगभूमी या महत्त्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. दलित रंगभूमीची पायाभरणी करणाऱया महाजन यांनी प्रकाश त्रिभुवन यांच्या थांबा रामराज्य येतयंची मजबूत उभारणी केली. राज्यनाटय़ स्पर्धा गाजवलेल्या या नाटकास दिल्लीकरांनी निमंत्रित केले. युगयात्रा प्रवाहातील ‘रंगसंहिता’ या महत्त्वाच्या ग्रंथाचे महाजन यांनी संपादन केले होते. या भरीव आणि ठसठशीत योगदानाचा त्यांचा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मान झाला. नटवर्य लोटू पाटील पुरस्कार लाभला. केंद्र सरकारच्या भाषा विभागाच्या वाचण्यासाठी संदर्भग्रंथ म्हणून त्यांच्या ‘नाटय़धर्मी मराठवाडा’ या महत्त्वाच्या ग्रंथाची निवड झाली. मराठवाडय़ाच्या सशक्त आणि दमदार रंगभूमीचा चालताबोलता इतिहास म्हणजे त्र्यंबक महाजन होते.
- प्रशांत गौतम




























































