
>> डॉ. अमित बागवे
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स हे तंत्रज्ञान तुम्ही शिकलात तर जगभरातील लोक तुमच्याकडे येतील. तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय आता गत्यंतर नाही हे समजून घ्या.
आज आपण सर्वजण स्मार्टफोनचा वापर सराईतपणे करू लागलो आहोत. आज 5-6 वर्षांच्या छोटय़ा मुलांपासून ते 50-60 वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करू लागले आहेत व अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहेत. तुमचा उद्योग उभा करण्यासाठी सोशल मीडिया हा उत्तम फ्लॅटफॉर्म आहे.
अनेक लोक सोशल मीडियाचा वापर करून पैसे कमवीत आहेत. टीव्ही चॅनेलसारख्या इतर प्लॅटफॉर्मवर जर जाहिरात करायला गेलो तर खर्च खूप येतो. हा खर्च व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात सगळ्यांना परवडेलच असे नाही. अशावेळी सोशल मीडियावर आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात मोफत करून लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो.
आज लोकांचा स्टॉक मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन अद्याप बदललेला नाही. उद्योजक येथून भांडवल उभारणी करू शकतात. शेअर मार्केटमधून आपण व्यवसायासाठी लागणारे भांडवल बिनव्याजी उभे करू शकतो.
नवे तंत्रज्ञान येत आहे. जे कोर्स आपण आज करतो, ते काही वर्षांनी बदलणार आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, चॅट जीपीटी, थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान यांचा वापर वेगाने वाढणार आहे. नोकऱ्या संपत आहेत. पण या तंत्रज्ञानाची कास जे धरतील त्यांनाच प्रचंड पैसे मिळणार आहेत.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स हे तंत्रज्ञान तुम्ही शिकलात तर जगभरातील लोक तुमच्याकडे येतील. लाखो व करोडो रुपये आपण कमवू शकणार आहोत. काही ठिकाणी हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स तंत्रज्ञान शिकवले जात आहे. या तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय आता गत्यंतर नाही हे समजणे आवश्यक आहे. जो तंत्रज्ञानासोबत चालेल तो तगेल आणि जो तंत्रज्ञानापासून लांब जाईल तो संपून जाईल.

























































