चालत राहा… धावत राहा…

502

>> वरद चव्हाण

[email protected]

मुग्धा गोडबोले. घरचा चौरस सात्त्विक आहार हेच तिचं डाएट. शिवाय चालणं आणि धावणं जोडीला आहेच.
नमस्कार फिटनेस फ्रिक्स!
आजचा आपला लेख एका अशा अभिनेत्रीवर आहे जिने साधारणपणे 90च्या काळात मराठी नाटक व टी.व्ही. (छोटा पडद्याच्या) माध्यमातून पदार्पण केलं. शुद्ध भाषा, दिसायला सुंदर आणि ‘उंची’ त्या काळात मराठी मुलींची एव्हरेज हाईट 5 फूट 3 इंच किंवा 5 फूट 4 इंच एवढीच असायची. अशा वेळीस एखादी उंच जर मुलगी आपल्या बाजूने जरी चालत गेली तरी आपोआप मुलांचं लक्ष या मुलीकडेच जात असे. आजच्या आपल्या फिट सेलिब्रिटीने स्वतःच्या अभिनयातूनच नव्हे तर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामुळे सुद्धा रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. ती मुग्धा गोडबोले-रानडे.
मुग्धाचं बालपण पुण्यात गेलं. शाळेत होणाऱया स्पोर्टस् कॉम्पिटिशनमध्ये जरी मुग्धा ऑक्टिव्ह असली तरी कुठल्याही स्पर्धेसाठी तिने शाळा/कॉलेजच प्रतिनिधित्व केलं नाही. त्यामुळे धावण्याची शर्यत, लंगडी, कबड्डी, खो-खोसारखे खेळ खेळले जात होते, पण हे खेळ शाळेत असणाऱया खेळाच्या तासापुरतेच राहीले. मुग्धाच्या फिटनेसचा पाया रचला गेला तो म्हणजे त्या काळच्या पुण्याच्या ‘कल्चर’मुळे. हे कल्चर म्हणजेच कुठेही जायचे असले तरी चालत जाणे किंवा सायकल चालवत जाणे. त्यामुळे लहानपणापासूनच सतत तास – 2 तास चालणं किंवा सायकल चालवणं होतच होतं. नातेवाईकांना भेटायचे आहे? चालत जा! मित्र-मैत्रिणींकडे जायचं आहे? चालत जा! शाळा-कॉलेजला जायचं आहे? चालत जा! चालणं किंवा सायकल चालवत जाणं हे त्या काळातल्या पुणेकरांसाठी मोड-ऑफ कम्युनिकेशन होतं असं ती आवर्जून सांगते. अभिनेत्री होण्यासाठी मुग्धा जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिला ‘आभाळमाया’सारखी प्रचंड लोकप्रिय झालेली मालिका मिळाली. त्या मालिकेचा पहिला चेक मिळाल्यावर मुग्धाने जिम जॉईन केलं. शूटिंगच्या वेळा आणि मुंबईत नवीन असल्यामुळे पुण्यासारखं कुठेही चालत जाणं शक्य नव्हतं म्हणून तिने जिमचा पर्याय निवडला. नुसतं चालणं नाही तर लहानपणापासून लागलेली अत्यंत महत्त्वाची सवय म्हणजेच बाहेरचं खाणं न खाणे. यामुळे मुग्धा कधीही जाड झाली नाही. घरचं सात्विक चौरस आहार कधीही आणि कितीही खाल्ला तरी त्याचं चरबीत रूपांतर होत नाही असं तिचं ठाम मत आहे. मुग्धाला चालणं इतकं आवडतं की ही आवड तिने नेक्स्ट लेव्हलला नेण्याचे ठरवले आणि म्हणूनच तिने ‘मॅरेथॉन’ धावण्याचा निश्चय केला. अर्थात यासाठी तिने डॉक्टरचा व स्वतःच्या पर्सनल ट्रेनरचा सल्ला घेतलाच. त्यावेळी आत्तासारखं मॅरेथॉन ग्रुप किंवा रनिंग ग्रुप मुंबईत नव्हतं. याशिवाय आतासारखी मॅरेथॉन्स धावण्याची क्रेझही नव्हती. त्यामुळे सगळी तयारी स्वतः करावी लागत असे. मुग्धाने स्वबळावर 5 कि.मी. आणि 10 कि.मी. सारखे मॅरेथॉन पूर्ण केले. मॅरेथॉन पूर्ण केल्यावर जे मानसिक समाधान मिळते त्याला तोड नाही असं तिचं ठाम मत आहे. प्रत्येक शरीरासाठी वेगवेगळा व्यायाम सूट होतो. तसंच मुग्धालाही हे जाणवलं की, तिचं शरीर वेट ट्रेनिंगसाठी बनलेलं नाही. मुग्धा कार्डिओ वर्कआऊटसाठी जेवढी उत्सुक असते तेवढीच ती वेट ट्रेनिंगपासून लांब पळते. आता खाण्या-पिण्याचं म्हणाल तर मुग्धाने कधीच फारसा डाएट केला नाही. एक तर सतत चालणं, लिफ्टचा वापर न करता जिने चढत जाणं आणि कार्डिओ वर्कआऊट यामुळे तिचं जेवण उत्तम पद्धतीने पचत होते. याशिवाय मुग्धाला ऑसिडिटीचा त्रास असल्यामुळे तिने डाएट करण्याचा विचारसुद्धा केला नाही. फक्त एकदा सीआयडी करत असताना तिला बारीक राहणं गरजेचं होतं. तेव्हा ती मुंबईत एकटी राहत असल्यामुळे बेकारीचे पदार्थ खूप खाल्ले जात असे त्यामुळे थोडं वजन वाढत होतं. पण मुग्धाचं मेटॅबोलिझम रेट इतका छान आहे की, हे बेकरीचे पदार्थ पूर्णपणे बंद केल्यावर तिचं वजन पटकन आटोक्यात आलं. तेव्हापासून आजपर्यंत मुग्धाने साध्या बिस्किटला सुद्धा हात लावलेला नाही. त्या काळात एकटं राहण्याचा डाएटच्या दृष्टीने अजून एक फायदा असा झाला की, मुग्धाचं रात्रीचं जेवण 7/7.30 लाच होऊ लागलं. कारण रात्री 10/10.30 ला पॅकअप झाल्यावर घरी जाऊन जेवण बनवणे शक्य नव्हते. त्यामुळे संध्याकाळी सेटवर येणारा नाश्ता व फळ हाच मुग्धाचा रात्रीचा आहार असायचा. मुग्धाला व्हेज-नॉन व्हेज दोन्ही खायला आवडत, पण नॉन व्हेजिटेरियनपेक्षा ती एगिटेरिअन जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही.
शूटवर जाताना नेहमीच ती सकाळच्या ब्रेकफास्टसाठी अंडय़ाचा कुठला न कुठला पदार्थ म्हणजे बॉईल एग, ऑमलेट, एग रोल घेऊन जातेच. याशिवाय ड्रायफ्रुटस्, केळं, संत्री, ताक अशा गोष्टी तिच्या बास्केटमध्ये असतातच. डिलिव्हरीनंतरसुद्धा डॉक्टर्सच्या सल्ल्याने मुग्धाने चालणं सुरू केलं. डिलिव्हरीच्या एक महिन्यानंतर 20 मिनिटं चालणं आणि 6 महिन्यांनंतर 40-45 मिनिटस् मग एक तास मग दीड तास अशा प्रकारे हळूहळू करत तिने तिच्या चालण्याचा रेट वाढवला आणि डिलीव्हरीनंतर साधारण वर्षभरात तिने तिचं वजन कंट्रोलमध्ये आणलं. एक गोष्ट आपण नोट करायला हवी, ती म्हणजे डाएटनी वजन कमी करणं आणि चालून किंवा व्यायामाने वजन कमी करणं यात खूप फरक आहे. डाएटमध्ये बरेच वेळा चेहऱयावरचं तेज किंवा चार्म निघून जातो. शिवाय अंगं किंवा स्नायू घट्ट न राहता सैल पडतात. बाहेरून जरी तुम्ही बारीक दिसत असलात तरी डाएट केलेल्या माणसाच्या शरीराला हात लावल्यावर लगेचच आपल्याला त्यांचं शरीर ढगळ किंवा मऊ वाटतं. म्हणून माझं ठाम मत आहे की डाएट करा, हरकत नाही पण डाएटच्या जोडीला व्यायाम आवश्यक आहे. मुग्धा आता 40 क्लबमध्ये आहे. आतासुद्धा तिचं चालणं सुरूच आहे. याशिवाय डॉक्टर्सच्या सल्ल्याने तिने मल्टी व्हिटॅमिन टॅबसुद्धा सुरू केले आहे. सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडेच ती लेह-लडाखची बाईक ट्रीप पूर्ण करून आली आहे. लडाखसारख्या ठिकाणी बाईक चालवणं व कमी ऑक्सिजनचा सामना करण्यासाठी फिट असणं अत्यंत गरजेचं आहे. मुग्धा आष्युभर अशीच फिट आणि चालत राहो आणि तिला बघून तिच्या चाहत्यांनीसुद्धा चालण्याचा मार्ग स्वीकारावा अशी आशा करतो.

आपली प्रतिक्रिया द्या