
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या वरिष्ठ गटात महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकाविले. अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणाऱया या लढतीत महाराष्ट्राने 127.25 गुणांनी सोनेरी यशाला गवसणी घातली, तर रेल्वेला 127 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या वरिष्ठ गटातील अनइवन बार्स प्रकारात महाराष्ट्राच्या अनुष्का पाटील हिने कांस्यपदक जिंकले.
हिंदुस्थानी हौशी जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या वतीने बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी ही स्पर्धा पार पडली. महिलांच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समधील वरिष्ठ गटाच्या सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी थरारक लढतीत बाजी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुंबईच्या अनुष्का पाटील व इशिता रेवाळे, ठाण्याची सारा राऊळ, पुण्याची शताक्षी टक्के, संभाजीनगरची रिद्धी हत्तेकर व मुंबईची रुजुल घोडके यांनी महाराष्ट्राला हे सुवर्णयश मिळवून दिले. या गटात यजमान महाराष्ट्राला रेल्वेच्या मुलींनी तोडीस तोड लढत दिली. खरंतर अखेरच्या क्षणापर्यंत रेल्वेचा संघच 2 गुणांनी आघाडीवर होता, मात्र त्यांची एक खेळाडू बॅलन्स करताना खाली पडली अन् हीच गोष्ट महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी पुरेशी ठरली. रेल्वेला 127 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पश्चिम बंगालने 115.55 गुण मिळवित कांस्यपदक जिंकले. महिलांच्या वरिष्ठ गटात अनइवन बार्स प्रकारात महाराष्ट्राच्या अनुष्का पाटील हिने 9.433 गुणांसह कांस्यपदक जिंकले. या प्रकारात रेल्वेच्या करिश्माचा करिश्मा बघायला मिळाला. तिने निर्विवाद वर्चस्वासह 10.500 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर आपला हक्क सांगितला. दिल्लीची स्नेहा तारियल रौप्यपदकाची मानकरी ठरली.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ऑलिम्पिकपटू दीपा कर्माकर व क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारप्राप्त विश्वेश्वर नंदी, मकरंद जोशी व स्पर्धा संचालक प्रवीण ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राला सर्वाधिक पदकांचा मान
यजमान महाराष्ट्राने आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत 2 सुवर्णांसह 7 रौप्य व 6 कांस्य, अशी एकूण सर्वाधिक 15 पदकांची लयलूट केली, मात्र रेल्वेने 4 सुवर्ण, 6 रौप्य व 2 कांस्य, अशा एकूण 12 पदकांसह गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवित सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राचा संघ सातव्या स्थानी राहिला. सेनादलाने 4 सुवर्ण, 4 रौप्य व 3 कांस्य, अशी एकूण 11 पदके जिंकून सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले. पश्चिम बंगाल 4 सुवर्ण, 3 रौप्य व 3 कांस्य अशा एकूण 10 पदकांसह तिसऱया स्थानी राहिला.
साक्षीचा पदकांचा चौकार
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या ज्युनियर गटात ठाण्याच्या साक्षी दळवीने महाराष्ट्राला चार पदके जिंकून दिली. तिने वैयक्तिक ऑल राऊंड, फ्लोअर एक्सरसाईज व अनइवन बार्स या प्रकारात रौप्यपदकांची कमाई केली, तर वार्ंल्टग टेबल प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली. वैयक्तिक ऑल राऊंड प्रकारात साक्षी दळवीने 40.750 गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. वॉल्टिंग टेबल व युनेवन बार्स या प्रकारात सरस कामगिरी केल्यानंतर बॅलन्सिंग बीम्स व फ्लोअर एक्सरसाईज या प्रकारात पिछाडीवर राहिल्याने तिला सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. त्रिपुराच्या श्रीपर्णा देबनाथ हिने अखेरच्या क्षणी मुसंडी मारत 42.400 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. पहिल्याच स्पर्धेत तिने हे सुवर्ण यश संपादन केले, हे विशेष. गुजरातच्या अवंतिका नेगी हिने 40.650 गुण मिळवित कांस्यपदकावर हक्क सांगितला. अनइवन बार्स प्रकारात साक्षीने 8.267 गुणांसह रौप्यपदक पटकाविले. गुजरातच्या अवंतिका नेगीने 9.067 गुणांसह सुवर्णपदकावर मोहर उमटवली. गुजरातचे स्पर्धेतील हे एकमेव सुवर्णपदक ठरले. कर्नाटकच्या निह वार्गेस हिने कांस्यपदक जिंकले. फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात साक्षी दळवीने 10 गुणांसह रौप्यपदकाला गवसणी घातली. त्रिपुराच्या श्रीपर्णा देबनाथ हिने 10.300 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर 9.600 गुणांची कमाई करणारी तामीळनाडूची ओकेना थॉमस कांस्यपदकाची मानकरी ठरली. वाल्टिंग टेबल प्रकारात साक्षी दळवीला 11.700 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्रिपुराची श्रीपर्णा देबनाथ 11.800 गुणांसह सुवर्णपदकाची मानकरी ठरली, तर पश्चिम बंगालच्या तोरा सानी हिने 11.733 गुणांसह रौप्यपदक जिंकले.