
>> अरूण
बालपणी अनेक कीर्तन ऐकली. कथेकरीबुवा सांगत ‘चौऱ्यांशी लक्ष योनीतल्या प्रवासानंतर एकदा हा उत्तम मानव-जन्म लाभतो बरं.’ यातलं तेव्हा काही कळत नव्हतं. पुढे समजलं की, पृथ्वीवरच्या एकूण सजीवांची संख्या चौऱ्यांशी लाख असून त्यामधे मनुष्य प्राण्याचा जन्म मिळणं दुर्मिळ आहे. आता पारंपरिक कथेत हा ‘चौऱ्यांशी लक्षां’चा आकडा कुठून काढला होता ठाऊक नाही. बारीक निरीक्षण आणि अंतस्फूर्त तर्क यावर ते आधारित होतं का तेही माहीत नाही. परंतु योगायोगाने म्हणा किंवा कसंही, पण आधुनिक विज्ञानानेही पृथ्वीवरच्या आपल्यासारख्या साऱ्या सजीवांची संख्या सुमारे 87 लाख ठरवली आहे. प्राचीन हिंदुस्थानी अभ्यासकांनी ती 84 लक्ष मानली होती. यामध्ये फारशी तफावत नाही.
मात्र हा आकडा पूर्णत्वाचा नाही. त्यात 13 लाख कमी-जास्त होऊ शकतात, असंही म्हटलं जातं. थोडक्यात पृथ्वीवरच्या सर्व सूक्ष्म आणि महाकाय प्रजातींची नोंदणी हा सतत चालणारा अभ्यास आहे. या सर्व सजीवांच्या प्रजातींचे ढोबळमानाने काही विभाग करता येतात. आपण ज्यांना ‘प्राणी’ म्हणतो त्यात माणसासह सर्व सस्तन प्राणी, पक्षी, मासे वगैरे मिळून जवळपास 71 लाख सजीव येतात. त्याशिवाय फंगी किंवा बुरशीच्या पातळीवरचे सूक्ष्म आणि दृश्य सजीव (म्हणजे मश्रुमसारखे) 6 लाख 10 हजार असतील. ही सर्व सूक्ष्म आणि महाकाय एक प्रजातीय मंडळी किती तर 2 लाख 98 हजार एवढी. मग एकपेशीय सजीवांचं काय? अमिबासारख्या सजीवांच्याही विविध प्रजाती असतातच. त्यांची आजवरची गणती 36 हजार 400 इतकी आहे. शेवाळाच्या काही विशिष्ट प्रजाती म्हणजे ब्राऊन डायाटोम यांची प्रजातीय संख्यासुद्धा 27 हजार 500 एवढी आहे. त्यामध्ये ‘मायक्रोस्कोप’मधूनच दिसू शकणाऱया अतिसूक्ष्म (पेशीसदृश) सजीव प्रजातींची भर घालायची तर ‘आपण सारे’ म्हणजे सजीव कदाचित 1 ते 6 अब्ज प्रजातीचे असू शकतो. त्यातल्या एका ‘प्रगत’ मानवी प्रजातीची गणना सर्व देश करत असतात. ती संख्या आता 8 अब्जांवर जात आहे. मात्र पृथ्वीच्या निर्मितीपासून माणसाच्या प्रगतीपर्यंतच्या काळात असंख्य सजीव तयार झाले आहेत. निसर्गाच्या या निर्हेतुक उद्योगात सूक्ष्मकणांच्या संयोगाने निर्माण झालेली सृष्टी आपल्याला दिसते, कळते हे आपल्या मानव प्रजातीचं वैशिष्ट्य. मात्र त्याचा उपयोग सजीवसृष्टी टिकवण्यासाठी झाला पाहिजे.





























































