प्रभू राम समजून लोकं आजही माझ्या पाया पडतात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ही भूमिका अरुण गोविल साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे

‘रामायण’ ही 80 च्या दशकात संपूर्ण हिंदुस्थानात प्रसिद्ध झालेली मालिका होती. या मालिकेतील कलाकारांना आजही अनेकजण देवाप्रमाणे मानतात. या मालिकेमध्ये प्रभू श्रीरामाची भूमिका अभिनेता अरुण गोविल यांनी साकारली होती तर सीतामातेची भूमिका दीपिका चिखलियाने साकारली होती. रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिकेचा पहिला भाग 1987 साली प्रदर्शित झाली होता. एक वर्ष ही मालिका चालली मात्र त्याची आठवण आजही अनेकांच्या मनात कायम आहे.

अरुण गोविल यांनी सांगितले की सुरुवातील त्यांना रामाची भूमिका देण्यात आली नव्हती. त्यांना लक्ष्मण किंवा भरताची भूमिका देण्यात आली होती. अरूण गोविल यांनी याला नकार दिला होता. त्यानंतर अचानक एकेदिवशी रामानंद सागर यांचा त्यांना निरोप मिळाला आणि त्यांची निवड रामाच्या भूमिकेसाठीच झाल्याचं सांगितलं. त्यांनी साकारलेली भूमिका इतकी गाजली होती की लोकांनी त्यांचा फोटो घरामध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो म्हणून लावायला सुरुवात केली होती. अरुण गोविल यांनी सांगितलं की त्यांचा अभिनय लोकांना इतका आवडला होता की लोकं आजही त्यांना प्रभू श्रीराम समजून पाया पडतात.

अरुण गोविल यांना राजकारणात येण्यासंदर्भातही अनेक प्रस्ताव आले होते. गेल्या निवडणुकीतही मला चांगला प्रस्ताव देण्यात आला होता असं गोविल यांनी सांगितलं आहे. माझा स्वभाव सरळ स्पष्ट असल्याने मला राजकारण जमू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. अनेकांनी त्यांना सल्ला दिला होता की त्यांनी श्रीरामाची भूमिका साकारल्याचा फायदा उचलावा. मात्र हे योग्य नसल्याने मी या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केलं असं गोविल यांनी सांगितले.

या भूमिकेमुळे अरुण गोविल एका रात्रीत प्रसिद्ध झाले. मात्र या प्रसिद्धीचा त्यांना तोटाही झाला. ही मालिका करण्यापूर्वी गोविल यांनी चित्रपटात काम केलं होतं. मालिकेनंर जेव्हा त्यांनी चित्रपटासाठी निर्मात्यांकडे फेऱ्या मारायला सुरुवात केली तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही रामाच्या भूमिकेत इतके फिट बसला आहात की तुम्हाला इतर भूमिका देणं अवघड आहे. फारतर सहकलाकाराची भूमिका देऊ असं काही निर्मात्यांनी सांगितलं. अरुण गोविल यांनी भूमिका मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी झाले नाहीत. अखेर त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.