नाद-मराठी – प्रभाती सूर नभी रंगती…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीच्या स्वरमंडित शुभेच्छांचा हा दुसरा भाग, ‘ग्रंथाली आणि अॅडफीझ’च्या पहाटगाण्यांच्या आज होणाऱया कार्यक्रमाची ‘थीम’ आपल्या लेखमालेसारखीच ‘अमराठी गायक गायिकांची मराठी गाणी’ अशी आहे. तर पहाटगीतांची मराठी परंपरा शतकानुशतकांची आणि समृद्ध आहे. यातली अनेक पहाटगीतं अमराठी गायकांनी स्वरबद्ध केली आहेत. अर्थात त्याचबरोबर आपल्याकडच्या विविध गानशैलीच्या गायक-गायिकांचं योगदानही त्यात मोठं आहे.

भारतरत्न भीमसेन जोशी कर्नाटकातून येऊन मराठी झाले. त्यांच्या स्वरातलं जगद्गुरू तुकाराम यांचा अभंग असलेलं पहाटस्वरातलं अप्रतिम गीत म्हणजे ‘आम्हा घरी धन, शब्दांचिच रत्ने, शब्दांचिच शस्त्र्ाs यत्ने करू’. तुकोबा त्यात पुढे म्हणतात, ‘शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन; शब्दे वाटू धन जनलोका किती समर्पक भाव आहे! चांगले शब्द आणि सूर माणसं जोडतात. सुरांचं नातं तर वैश्विक. श्रीनिवास खळे यांचं संगीत लाभलेला हा अभंग आहे. संत तुकारामांचीच एक भूपाळी उषा मंगेशकर यांनी गायिलेली आहे. तालवाद्यवादक अण्णा जोशी यांचं त्याला संगीत आहे. शब्द आहेत ‘उठा सकळजन, उठिले नारायण; आनंदले मुनीजन, तिन्ही लोक.’ अनेक पहाटगीतांचे गीतकार, संगीतकार, गायक कदाचित आपल्या नेहमीच्या ऐकण्यातले नसतात, पण त्यांच्या रचना आणि सादरीकरण तितपंच प्रत्ययकारी असतं. ‘शाहीर परशराम’ चित्रपटातलं वसंत पवार या दिग्गज संगीतकाराने स्वरसाज चढवलेलं ‘उठा झाला प्रातःकाल, तुझे गोपाल आले वननिळा; पूर्वदिशे उदेला भानू आला उदयाचला’ हे पं. वसंतराव देशपांडे यांचं कोरससह असलेलं प्रभात-गीत जरूर ऐका. ‘तुका झालासे कळस’ या चित्रपटासाठी ग.दि.माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं पहाटगीत म्हणजे ‘पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी हरी हरी’ या गाण्याचा स्वर आणि संगीत दोन्ही स्नेहल भाटकर यांचं आहे.

‘अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी’ नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी’ हे जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातल गाणं आठवते? गरब्याच्या गाण्याच्या चालीसारखं हे गाणं संगीतकार मधुकर गोळवलकर यांचं आणि शब्द आहेत गुरुनाथ शेणई यांचे. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे सकाळचे महत्त्वाचे राग म्हणजे भूप, देसकार, तोडी, निभास, भटियार वगैरे. ‘उंबरठा’ चित्रपटासाठी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी वसंत बापट यांच्या प्रार्थनागीताला अप्रतिम चाल लावली आणि भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ते गायिलं. ‘गगनसदन तेजोमय, तिमिरहरण करुणाकर, दे प्रकाश देई अभय’ हे गीत तिलककामोद रागावर आधारित आहे अशी माहिती मिळाली. ‘देव दीनाधारी धावला’ नाटकातली कुमार गंधर्व यांची ‘उठी उठी गोपाळा आणि ‘घनःशाम सुंदर’ ही होनाजी बाळा यांची ‘अमर भूपाळी’ तर मनामनात गुंजलेली. बरीच पहाटगीत श्रीराम आणि श्रीकृष्णासाठी गायिलेली. ‘उठी श्रीरामा पहाट झाली, पूर्व दिशा उमलली, उभी घेऊनि कलश दुधाचा काwसल्या माऊली’ ही भूपाळी रविंद्र भट यांची. संगीत सुधीर फडके आणि स्वर आशाताईंचा. देसकार-भूप रागातलं हे ‘ते माझे घर’ चित्रपटातलं गीत आहे. त्यातली एक कल्पना फार सुंदर आहे. बाल रामाने चंद्र हवा असा हट्ट धरल्यावर सुमंत त्याला दर्पणातला म्हणजे आरशातला चंद्र देतात़ अशी कथा त्याला अनुसरून रवींद्र भट लिहितात, ‘काल दर्पणी चंद्र दावुनि सुमंत गेले गृहा, त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा!’ अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्रीविठ्ठलासाठी रचलेल्याही अनेक भूपाळ्या आहेत. रवींद्र भट यांचंच ‘उठ विठ्ठला उठी गोपाळा उठवी चराचरू, प्राचीवरती प्रकाश फुलला उठला बघ दिनकरू या गीताचे गायक आणि संगीतकार आहेत राम फाटक. जनकवी पी.सावळाराम यांनी लिहिलेलं आणि वसंत प्रभू यांचं संगीत असलेलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं एक प्रभातगीत गेलं अर्धशतक गाजतंय. ते म्हणजे ‘विठ्ठला समचरण तुझे धरिते, रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते.’ ‘प्रभाती सूर नभी रंगती’ हे रमेश अणावकर यांचं पहाटगाणं पहाटेच्या निसर्गरूपाचं आणि जनजीवनाचं वर्णन करणारं. आशा भोसले यांच्या मधुर स्वराला संगीतसाज दिलाय वसंत प्रभू यांनी. ‘पानोपानी अमृत शिंपित उषा हासरी हसते धुंदीत, जागी होऊन फुले सुगंधित तालावर डोलती प्रभाती सूर नभी रंगती.’ ‘प्रभातकाळी तुझे ईश्वरा नाम मुखी येई तूच माऊली तूच साऊली सावळे विठाई’ या माणिक वर्मा यांनी गायलेल्या, गोविंद पोवळे यांचं संगीत असलेल्या मधुकर जोशी यांच्या गीतात म्हटल्यानुसार ‘चराचरावर अंधाराची होते ही अस्ताई’ असं घडू द्या. कोविड काळानंतरची ही पहिली मुक्त वातावरणातली दीपावली. सर्वांच्याच जीवनातला अंधार दूर होऊन तिथे सौख्याचा प्रकाश उजळाव आणि आनंदाचे सप्तसूर निनादावेत!

>> अरुण जोशी