
सामना ऑनलाईन । मुंबई
पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या ‘झिपऱ्या’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित चित्रपट साकार होत आहे. ‘झिपऱ्या’चा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला.
रेल्वे स्थानकांवर बुटपॉलिश करणारी किशोरवयीन मुले आपण अनेकदा बघितली असतील. ‘झिपऱ्या’ ह चित्रपट अशाच मुलांच्या भोवती फिरणारा आहे. बूटपॉलिश करणाऱ्या तरुणाचा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास चित्रपटात मांडण्यात आला आहे. सभोवतालची परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरीसुद्धा भविष्याबाबत तो निराश नाही. या कथेत असलेलं एक गूढ आणि त्या भोवती घेरलेलं झिपऱ्याचं आयुष्य आहे, तर दुसऱ्या बाजूला दारिद्र्य, हालअपेष्टा यांच्यावर मात करून मित्रांच्या आयुष्यात सोनेरी रंग भरण्यासाठी तो धडपड करत आहे.‘झिपऱ्या’ची निर्मिती रणजीत दरेकर यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचे आहे. यामध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे.
‘झिपऱ्या’चे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचे पाश्र्वसंगीत ख्यातनाम तालवादक तौफिक कुरेशी यांनी दिले आहे . येत्या २२ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.






























































