संतांनी केलेल्या बंडखोरीकडे नव्या साहित्यिकांनी पहावे- डॉ.अरुणा ढेरे

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सर्वात मोठी बंडखोरी कोणी केली असेल, तर ती संतांनी. ती सुद्धा कोणत्याही प्रकारचा झेंडा न नाचवता! गीता शूद्रांपर्यंत पोहचवणं ही बंडखोरीच होती. या संतकालीन घडलेल्या बंडखोरीकडे नव्या साहित्यिकांनी पाहिले पाहिजे’, असे मत 92व्या मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा व ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी मांडले. कोमसाप, जनसेवा ग्रंथालय, शहर वाचनालय, अभ्यंकर ग्रंथालय यांच्यावतीने आयोजित सत्कार व मुलाखत कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

राणी लक्ष्मीबाई सभागृह, रत्नागिरी येथे साहित्यप्रेमी, रसिक, वाचकांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोमसापच्या नमिताई कीर यांनी प्रास्ताविक मांडले. त्यानंतर चारही संस्थांच्यावतीने संयुक्तिकरित्या प्रमुख पाहुण्या लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुरेश जोशी यांच्याहस्ते स्वामी स्वरूपानंद लिखित ज्ञानेश्वरी, शाल-श्रीफळ, अविष्कारच्या मुलांनी तयार केलेला गुच्छ व अत्तराची कुपी असलेले सोनचाफा फूल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष डॉ. सुरेश जोशी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ‘स्त्रीचा सन्मान लेखनातून करण्याचे काम अरुणाताईंनी केले आहे. वाचकांना पुढे नेण्याची ताकद त्यांच्या लेखनात आहे. त्यांच्या भाषेत गोडवा आहे. होकारात्मक जगणे-वागणे महत्वाचे असून संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणे, ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे.’

प्राध्यापिका जयश्री बर्वे व विनय परांजपे यांनी अरुणा ढेरे यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना अरुणा ढेरे म्हणाल्या की, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सर्वात मोठी बंडखोरी कोणी केली असेल, तर ती संतांनी केली. तीसुद्धा कोणत्याही प्रकारचा झेंडा न नाचवता! स्वातंत्र्य मागून मिळत नाही, त्यासाठी गटा-तटाची, द्वेषाची किंमत मोजावी लागते. गीता शूद्रांपर्यंत पोहचवणं, ही बंडखोरीच होती. दुर्बोधता टाळत अणुरणियां थोकडा, तुका आकाशाएवढा हा अवघड आशय संतच सोप्या शब्दात देऊ शकले. या संतानी केलेल्या बंडखोरीकडे नव्या साहित्यिकांनी पाहिले पाहिजे’, असे मत मांडले.

तर अभिव्यक्ती स्वांतत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, ‘मराठी साहित्य संमेलनात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा विशिष्ठ राजकीय संदर्भात सुरू झाली. त्याला खूप मोठं सामाजिक परिमाण मिळालं. असहिष्णूता सगळ्या बाजूंनी वाढते आहे. त्याचा निषेध प्रत्येक साहित्यिकांनी करायला हवा. लेखिका म्हणून नयनतारा सहेगल काय लिहितात, याची कल्पना नसताना एक वादळ निर्माण झालं. ही चुकीची गोष्ट आहे. नयनतारा या स्वतंत्र भूमिका मांडणार्‍या लेखिका आहेत. त्यांना निमंत्रित केल्यानंतर त्यांना येऊ नका, असे म्हणणे, ही गोष्ट चुकीची होती. त्यांच्या भाषणावर, साहित्यावर उलटसुलट चर्चा होणं, हे नंतरही घडलेलं नाही, मग कशासाठी विरोध केला गेला..? असा सवाल करत यानिमित्ताने आपापले छुपे अजेंडे पुढे आणणार्‍या माणसांनी आपण समाजापुढे काय न्यायचं आहे, याचा विवेक करायला हवा,’ असे खडेबोल सुनावले.

एकेकाळी साहित्यिकाचा शब्द एखाद्या मंत्रासारखा मानला जायचा. आज साहित्यिकांनी स्वत:लाच अनेक बाबतीत बाजारात उभं केलं आहे. आपण विक्रेय वस्तू झाल्याची अवस्था अनेक साहित्यिकांची झाली आहे. त्यामुळे साहित्यकांकडे कुणीही बोट दाखवू लागले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार साहित्यिक आहेच, शिवाय समाजही आहे. सगळ्यांनी मिळून साहित्यविश्व कसे असावे, याचा पुनर्विचार केला पाहिजे. आपण मिळून चांगल्या साहित्य संस्कृतीची घडण केली पाहिजे. ती जबाबदारी वाचक, साहित्यिक, प्रकाशक, ग्रंथालयं या सर्वांची आहे. समाजात इतकी फुटीरता आहे, इतके भेदाभेद आहेत. तरीही ज्या चार संस्था एकत्र आल्या, आणि हा कार्यक्रम केला त्याचा आनंद खूप मोठा आहे. असं चांगल्या गोष्टीसाठी एकत्र येणं घडलं पाहिजे, असे गौरवोद्गार अरुणा ढेरे यांनी काढले.

कार्यक्रमासाठी व्यासपीठावर कोमसापच्या नमिता कीर, जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, शहर वाचनालयाच्या अध्यक्षा मोहिनी पटवर्धन, कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाचे अध्यक्ष मधुसुदन बोरसुतकर, कार्यक्रम अध्यक्ष डॉ. सुरेश जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाला श्रीकृष्ण साबणे, बापटकाका, प्रा. निधी पटवर्धन, कवयित्री वैशाली हळबे, प्रसाद घाणेकर, विवेक भावे, दाक्षायणी बोपर्डेकर, देवळेकर यांसह रसिक, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या