कुंडलवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अरुणा कुडमुलवार अपात्र, भाजपला धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aruna-kudmulwar

>> कुणाल पवारे

कुंडलवाडी नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अरुणा विठ्ठल कुडमुलवार हे मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे राज्याच्या नगरविकास विभागाने कुडमुलवार यांना पूर्वलक्षी प्रभावाने अपात्र ठरविले आहे. याबाबतचे आदेश नगर विकास विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांनी 7 सप्टेंबर रोजी जारी केले आहेत. 10 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पूर्वीच हा निर्णय आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

डिसेंबर 2016 मध्ये कुंडलवाडी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. नगराध्यक्ष पद हे ओबीसी (महिला)या प्रवर्गासाठी आरक्षित होते. भाजपकडून अरुणा विठ्ठल कुडमुलवार यांनी तर काँग्रेस तर्फे अर्चना भीम पोतनकर यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत भाजपच्या अरुणा कुडमुलवार या विजयी होऊन नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्या. निवडून आलेल्या सहा महिन्यांत जात वैधताप्रमाणपत्र सादर करावयाचे होते. पुढे शासनाने ही यात सहा महिन्याची मुदतवाढ देत प्रमाणपत्र सादर करण्यास बारा महिन्याचा कालावधी दिला. तरीही अरूणा कुडमुलवार हे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. यावर काँग्रेसचे उमेदवार अर्चना पोतनकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत वेळोवेळी निवेदन देऊन अरूणा कुडमुलवार यांना अपात्र करण्याची मागणी केली. तसेच संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अरूणा कुडमुलवार यांचे नगराध्यक्षपद रद्द करण्याची मागणी केली होती.

जात पडताळणी समितीच्या सदस्यात कुडमुलवार यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यावरून मतभिन्नता होती. यामुळे कुडमुलवार यांनी न्यायालयात पडताळणी समितीच्या निर्णयास आव्हान देत पद संरक्षण मिळविले. त्यामुळे त्या नगराध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. तसेच काँग्रेसचे अर्चना पोतनकर यांनीही संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत कुडमुलवार यांना आपात्र करा अशी मागणी केली होती. या सर्वांवर न्यायालयाने 16 जून 2020 रोजी निकाल देत कुडमुलवार यांचे पद संरक्षण काढून घेतले होते. त्यामुळे अर्चना पोतनकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे कुडमुलवार यांना अपात्र करण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नाही. यानंतर पुन्हा पोतनकर यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. अखेर न्यायालयाने कुडमुलवार प्रकरणी काय कारवाई केली? याचा खुलासा जिल्हाधिकारी यांनी 8 सप्टेंबर पर्यंत द्यावा असा आदेश दिला. यानंतर मात्र नगरविकास विभागाने 7 सप्टेंबर रोजीच जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्यामुळे अधिनियमातील तरतुदी नुसार अरुणा कुडमुलवार यांना भुतलक्षी प्रभावाने अनर्ह ठरविण्यात येत असल्याचे आदेश जारी केले.