
सामना प्रतिनिधी । अलिबाग
माणगाव तालुक्यातील वाके येथील आठ वर्षांची बालिका दिया जयेंद्र जाईलकर हिच्या हत्येपाठोपाठ तालुक्यातील रवाळजे येथील परिचारिका अरुणा उभारे यांच्याही हत्येचे गूढ उकलण्यास माणगाव पोलिसांना यश आले आहे. संपत्तीच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे या घटनेत फिर्यादीच आरोपी असल्याचे समोर आले आहे.
रवाळजे येथील अरुणा उभारे घरात एकटय़ा असताना ३० मे रोजी त्यांची हत्या झाली होती. हत्येनंतर सुमारे पाऊणे दोन लाखांचा ऐवज लंपास झाल्याने ही हत्या दरोडय़ाच्या हेतूने झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा होता. सदर घटनेची फिर्याद रमेश शंकर मेंगडे (५३) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली होती. गुह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळ क आजूबाजूच्या परिसराची पाहणी पोलिसांनी केली असता सदरचा प्रकार हा दरोडय़ाचा नसल्याचे उघड झाले. त्यामुळे पुन्हा नव्याने तपास करून पोलिसांनी रमेश मेंगडे याला बेडय़ा ठोकल्या. आरोपी हा मृत अरुणाचा मोठा मेहुणा असून संपत्तीसाठी पत्नीच्या मदतीने ही हत्या केल्याचे त्याने कबूल केले.


































































