
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रावर जोरदार टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे.
एक काळ होता की त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अति केले होते. आताच्या परिस्थितीत पंतप्रधान मोदी अति करत आहेत, असा हल्ला त्यांनी चढवला. इंदिरा गांधी यांनी अति केल्यावर जनतेने त्यांना नाकारले. आता भाजपवर लवकरच झाडू फिरणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मी अनेक लोकांशी बोललो, लोकांमध्ये भाजपविरोधात प्रचंड संताप आहे. भाजपचे लोक काय करतात, तर वाटेल त्याला पकडून तुरुंगात टाकतात. त्यांनी आमच्या दोन चांगल्या मंत्र्यांना अटक केली. या दोन्ही मंत्र्यांनी संपूर्ण जगात देशाचे नाव उंचावले आहे,असेही केजरीवाल म्हणाले.
मनीष सिसोदिया यांनी सरकारी शाळेला नवसंजीवनी दिली.संपूर्ण जगाला शिक्षणाचा आदर्श दिला. मद्य धोरण हे फक्त कारण आहे. पंतप्रधानांना दिल्लीत सुरू असलेली चांगली कामे थांबवायची आहेत. मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर अनेक ठिकाणी त्यांचे सरकार आहे, पण इतक्या वर्षातही शाळा किंवा रुग्णालयांची परिस्थिती सुधारू शकले नाहीत.मग आता काय करायचे, तर आम आदमी पार्टीला चांगली कामे करू द्यायची नाहीत. स्वतःला जे करता येत नाही, दुसऱ्यांनाही करू द्यायचे नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली.
मनीष सिसोदिया यांनी शिक्षणात चांगले काम केले नसते तर त्यांना अटक झाली नसती. सत्येंद्र जैन यांनी आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले नसते तर त्यांना अटक झाली नसती. काम थांबवणे हाच उद्देश होता. मनीष सिसोदिया आज भाजपमध्ये दाखल झाले तर उद्या त्यांची सुटका होईल. सत्येंद्र जैन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास सर्व खटले संपतील आणि ते तुरुंगातून बाहेर येतील. आज मी दिल्लीतील जनतेला आश्वासन देऊ इच्छितो आपचे काम थांबणार नाही. आप एक वादळ आहे. भाजप आम्हाला थोपवू शकणार नाही. आम्ही आधी 80 च्या वेगाने जात होते, आता आम्ही 150 च्यावेगाने धावणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



























































