
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. मंगळवारी दिल्ली विधानसभेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘जर (हिंडेनबर्ग अहवालात) ईडी किंवा सीबीआय चौकशी झाली, तर मोदींचं पतन होईल, अदानींचं नाही.’
अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणासाठी काहीही केले नाही, मग ते आपल्या मित्रावर एवढी मेहरबानी का करतात? एवढं मोठं संकट आलं, हिंडेनबर्ग रिपोर्ट आला… मोदीजी अदानींना वाचवण्यात मग्न आहेत. यात राजकीय गणित देखील आहे’.
आपल्या भाषणात त्यांनी मोदीना लक्ष्य केलं. ‘अदानी फक्त चेहरा आहेत असे म्हणतात; त्याच्यामागे गुंतवणूकदार मोदी आहेत’, असं केजरीवाल पुढे म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला की पंतप्रधान मोदींनी अदानी समूहाला 442 दशलक्ष डॉलर्सचा पवन ऊर्जा प्रकल्प देण्यासाठी श्रीलंकेवर ‘दबाव’ आणला.
‘मोदीजींनी श्रीलंकेला पवन प्रकल्प अदानीला देण्यास भाग पाडले… तांत्रिकदृष्ट्या, हा प्रकल्प अदानींना नाही, तर स्वत:ला (पीएम मोदी) देण्यात आला होता. श्रीलंकेच्या संसदेत राजपक्षे यांना याबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, त्यांनी हा प्रकल्प दबावाखाली दिला आहे’, असं अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्ली विधानसभेत सांगितलं.
दोन वर्षांपूर्वी जेव्हा विमानतळांचं खासगीकरण करण्यात आलं तेव्हा शेवटच्या क्षणी लिलावाच्या काही अटी काढून टाकण्यात आल्या आणि सहा विमानतळ अदानी समूहाला देण्यात आले, असा दावाही त्यांनी केला.
दोन वर्षांपूर्वी सहा विमानतळांचा लिलाव करण्यात आला होता. अखेरच्या क्षणी अटी काढून सहा विमानतळ अदानीला देण्यात आले. हे अदानींनी नाही तर खुद्द मोदींनी केलं’, असं ते म्हणाले. विमानतळाचा 30 टक्के व्यवसाय मोदींकडे असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.





























































