
दिल्ली कथित मद्य घोटाळा प्रकरणी रविवारी ईडीकडून केजरीवाल यांना नवव्यांदा समन्स देण्यात आला. याच्या काही तासानंतर ईडीने दिल्ली जल मंडळात अवैध निविदा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवण्यात आले. अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्ली कथित मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने जारी केलेल्या समन्सविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना पहिला समन्स 2 नोव्हेंबर 2023 रोजी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 21 नोव्हेंबर, 3 जानेवारी, 18 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी, 4 मार्च आणि 18 मार्च रोजी समन्स पाठवण्यात आलं होतं. या सर्व नऊ समन्सच्या विरोधात केजरीवाल यांनी याचिका दाखल केली आहे.
अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने सोमवारी 18 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांना दिल्ली जल मंडळातील कथित 20 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट’ (पीएमएलए) च्या कलम 50 अंतर्गत नोटीस बजावली होती.





























































