दिल्लीकरांना केजरीवाल यांचे गॅरंटी कार्ड; पदवीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी सरकार घेणार

346

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. रविवारी आम आदमी पार्टीने केजरीवाल यांचे गॅरंटी कार्ड जारी केले. 10 सुविधांची  हमी देणारे हे गॅरंटी कार्ड जाहीरनाम्याहून वेगळे असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला असून त्याअंतर्गत पुढच्या पाच वर्षांत जनतेला 200 युनिट वीज मोफत आणि प्रत्येक घरात 24 तास शुद्ध पाणी मिळत राहील असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

‘आप’ने दिल्ली विधानसभेसाठी 70 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी असून 8 फेब्रुवारीला मतदान, तर 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत.

 ‘आप’चा जाहीरनामा येत्या 10 ते 15 दिवसांत येणार आहे. हे आमचे गॅरंटी कार्ड असून विकासाची पक्की गॅरंटी आहे. काही आश्वासने मोठी आहेत. त्यामुळे ती पूर्ण करण्यासाठी 2, 3 किंवा 5 वर्षे जातील असेही केजरीवालांनी सांगितले. 

गॅरंटी कार्डमधील दहांपैकी काही सुविधा

  • दिल्लीत ज्याने जन्म घेतला त्या मुलाच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार घेईल. बारावीनंतर शैक्षणिक कर्ज देण्याची जबाबदारीही यात असेल.
  • प्रत्येकाला मोफत, उत्तम उपचार मिळावेत यासाठी मोहल्ला क्लिनिक बनवणार.
  • आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली जाईल. 11 हजार बसेस धावतील. 500 किलोमीटरहून अधिक मेट्रोचे जाळे पसरवण्यात येईल. महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाईल.
आपली प्रतिक्रिया द्या