तुम्ही समन्स पाठवत राहा, आम्ही शाळा उभारतो! अरविंद केजरीवाल यांचा पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सआडून तोडफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपवर सडेतोड पलटवार केला आहे. तुम्ही जितके समन्स मला पाठवाल तितक्या शाळा मी उभारेन असं केजरीवाल यांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे.

2014-15 या काळात देशात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. 2014मध्ये देशातील जनतेने केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार बहुमताने निवडणून आणलं. तर फेब्रुवारी 2015मध्ये अर्ध्या दिल्लीतल्या 70पैकी 67 सीट देऊन एक नवीन पक्ष म्हणजेच आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं. ही दोन्ही सरकारं प्रचंड बहुमताच्या आधारावर स्थापन झाली. जेव्हा जनता इतकं बहुमत देते तेव्हा जनतेला सरकारकडून प्रचंड अपेक्षा असतात. या दोन्ही सरकारांनी गेल्या दशकात दोन प्रकारची प्रशासकीय उदाहरणं लोकासंमोर ठेवली. यातलं एक सुशासनाचं आहे तर दुसरं विनाशाचं आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली.

ईडीच्या आठव्या समन्सवर बोलताना केजरीवाल म्हणाले की, तुम्ही जितके समन्स मला पाठवाल, मी तितक्या शाळा उभारेन. तुम्ही तुमचं कर्तव्य करा, मी माझं करत राहीन. मी आज विधानसभेत हीच घोषणा केली की मला ईडीचे आठ समन्स आले आहेत, त्यामुळे दिल्लीत आठ नवीन शाळा स्थापन केल्या जातील, असं केजरीवाल आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले आहेत.