
लोकशाही मार्गाने दिल्लीत आलेली आम आदमी पार्टीची सत्ता बळजबरीने हिसकावण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. आपची सत्ता घालवण्यासाठी आमच्या नेत्यांवर खोटय़ा केसेस करून त्यांना फसवले जात आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही त्यांना घाबरणार नाही, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती तोफ डागली.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळा हा फेक घोटाळा आहे. दिल्लीतील सरकारला हटवण्यासाठी हा घोटाळा उभा केला आहे. एक फेक घोटाळा बनवून खासदार संजय सिंह, सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया, विजय नायर यांना अटक केली. आता ते मला अटक करण्याची तयारी करीत आहेत. भाजपवाल्यांचा उद्देश एकच आहे. त्यांना आम आदमी पार्टीच्या टॉप नेतृत्वाच्या नेत्यांना अटक करायची आहे.
दिल्लीतील सरकार हिसकावयाचे आहे. दिल्लीत भाजपचे सरकार बनवण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. त्यांना माहिती आहे की, आम आदमी पार्टीला निवडणुकीत पराभूत करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी हा मार्ग अवलंबिला आहे, असे केजरीवाल म्हणाले. आम्ही लोक जेलमध्ये जायला घाबरत नाहीत. जेल आमच्यासाठी भूषण आहे. एका क्रांतिकारकासाठी जेल भूषण असते. एकदा मी 15 दिवस जेलमध्ये राहून आलो आहे. भगत सिंह जेलमध्ये राहू शकतात, मनीष सिसोदिया 9 महिने जेलमध्ये राहू शकतात, सत्येंद्र जैन एक वर्षापासून जेलमध्ये राहू शकतात, तर मला जेलमध्ये जायला काय अडचण आहे, असेही केजरीवाल म्हणाले.
आम्हाला सत्तेची लालसा नाही. जगातील मी पहिला मुख्यमंत्री आहे, ज्याने 49 दिवसांत राजीनामा दिला होता. मला कोणी राजीनामा मागितला नव्हता. आताही दिल्लीतील जनतेला विचारून राजीनामा देईन. मला राजीनामा द्यायला हवा की, जेलमधून सरकार चालवायला हवे यासंबंधी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करीत आहे. आम्ही दिल्लीतील जनतेच्या परवानगीविना काहीच करीत नाही, असेही केजरीवाल म्हणाले.






















































