भाजप मते विकत घेते त्याला संघाचा पाठिंबा आहे का? केजरीवालांचे भागवतांना पत्र

भाजपचे नेते पैसे वाटून मते विकत घेत आहेत का? तसेच पूर्वांचली आणि दलित लोकांची नावे हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मते विकत घेऊन भाजप लोकशाही कमकुवत करत आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटत नाही का? भाजपला मते विकत घ्यायला आरएसएसचा पाठिंबा आहे का? अशा प्रश्नांचा भडीमार दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर केला. याबाबत केजरीवाल यांनी भागवतांना पत्र लिहिले आहे.

केजरीवाल यांनी भाजपवर मते विकत घेण्याचा आरोप केल्यानंतर ‘आप’च्या नेत्या प्रियंका कक्कर यांनी शाहदरा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते विशाल भारद्वाज यांनी मतदारांची नावे वगळण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केल्याचा दावा केला आहे. तसेच दिल्लीत राहणाऱया अनेक पूर्वांचलवासीयांची मते भाजपला कापायची आहेत, असा आरोपही केला आहे. भाजप यंदा निरोगी राजकारण करेल अशी अपेक्षा आहे. ते आपली सत्ता असलेल्या 20 राज्यांमध्ये मोफत वीज, पाणी यांसारख्या केजरीवाल यांच्या कल्याणकारी योजनांचा अवलंब करतील का? असा सवालही केला आहे.

केजरीवाल यांचे सवाल

  • दिल्ली निवडणुकीत आरएसएस भाजपसाठी मते मागणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. हे बरोबर आहे का?
  • जनतेला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की आरएसएस पूर्वी भाजपने केलेल्या चुकीच्या कृत्यांचे समर्थन करते आहे काय?
  • भाजपचे नेते खुलेआम पैसे वाटून मते विकत घेत आहेत. आरएसएस मत खरेदीचे समर्थन करते का?
  • गरीब, दलित, पूर्वांचली यांची मते कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे करणे भारतीय लोकशाहीसाठी योग्य आहे, असे आरएसएसला वाटते का?

भाजप म्हणाले केजरीवालांनी नव्या वर्षात पाच संकल्प घ्यावेत

दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र कुमार सचदेवा यांनीही केजरीवाल यांना पत्र लिहून नव्या वर्षात पाच संकल्प घेणयाचे सुचवले आहे. तुमच्या मुलांची तुम्ही पुन्हा कधीही खोटी शपथ घेणार नाहीत असा विश्वास द्या. खोटी आश्वासने देऊन तुम्ही दिल्लीतील महिला, वृद्ध आणि धार्मिक लोकांच्या भावनांशी खेळणे बंद कराल. दिल्लीत दारूला प्रोत्साहन दिल्याबद्दल तुम्ही दिल्लीच्या लोकांची माफी मागाल. यमुनामैयाच्या स्वच्छतेबाबतचे खोटे आश्वासन आणि स्वच्छतेच्या नावाखाली केलेल्या भ्रष्टाचाराच्या गुह्याबद्दल जाहीर माफी मागाल. तुम्ही राष्ट्रविरोधी शक्तींना भेटणार नाही आणि राजकीय फायद्यासाठी देणग्या स्वीकारणार नाही अशी शपथ घ्याल असे संकल्प केजरीवाल यांनी घ्यावेत असे सुचविण्यात आले आहे.