
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न फक्त शिवतीर्थावर होईल आणि बीकेसीवर होणार नाही का? असा कडक सवाल करत शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी पालिकेने नमूद केलेल्या गृहविभागाच्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित केलेला आहे.
मुंबई महापालिकेनं शिवसेना आणि शिंदे गटाला पोलिसांच्या हवाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली. त्यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अरविंद सावंत यांनी गृहमंत्रालयाला लक्ष्य केलं.
‘मुंबई शहरात एका मैदानावर कायदा सुव्यवस्था आणि दुसऱ्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था नाही? यातूनच कळतं आहे की किती एकीकडे झुकणारं (biased) अशा पद्धतीचं हे सरकार काम करत आहे. खरंतर तुम्हाला बीकेसीवर परवानगी मिळाली होती तिकडं गुण्यागोविंदानं मेळावा घ्यायला हवा आम्ही इकडे साजरा करू. दसरा हा सण आहे, हिंसेचा सण नाही तो. सीमोल्लंघन हा लढाईचा सण जुन्या काळी होता. आता विचारांचं सीमोल्लंघन आहे’, असं अरविंद सावंत म्हणाले.
‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याच मैदानावर हे विचारांचं सीमोल्लंघन वर्षानूवर्ष करत होते. आता जाणूनबूजून सगळं सुरू आहे. एकाच बाजूला झुकतं आहे’, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
‘यांना (गृहविभागाला) आताच कायदा सुव्यवस्था दिसते आहे. मग चून चून मारेंगे, हात पाय तोडू अशा वल्गना ज्या लोकांनी केल्या त्यावर काय कारवाई केली? त्यांचंही उत्तर द्यायला हवं. महाराष्ट्र हे पाहात आहे. राज्य कुठे चाललं आहे? हे गृमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होतं आहे का? हे त्यांच्याच स्क्रीप्ट प्रमाणे सुरू आहेत. म्हणून दिल्लीतला कागद हातात घेऊन वाचून दाखवावं लागत आहे. बोलविता धनी कोण आहे, त्यांनी हे ठरवलं आहे की शिवसेनेला आडवं जात राहायचं. मग जितके तुम्ही आडवे जाल, जितका चेंडू जोरात आपटाल तितकाच तो उसळून वर येईल’, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
तो दावा खोडून काढला!
दसरा मेळाव्याचा अर्ज नेहमी सदा सरवणकर करायचे, असा दावा केला जात असल्याचा प्रश्न विचारताच सावंत यांनी आठवण करून दिली की ते काँग्रेसमध्ये असताना दसरा मेळाव्याचा अर्ज अन्य लोकांनीच केला होता. त्यामुळे हा दावा त्यांनी उडवून लावला.































































