रामलीला मैदानावरून घोषणा करणे सोपे; प्रत्यक्षात काम करणे कठीण, अरविंद केजरीवालांचा मोदींवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रामलीला मैदानावरून घोषणा करणे सोपे आहे. परंतु, प्रत्यक्षात काम करणे अत्यंत कठीण आहे, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आज मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कामांची माहिती दिली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे आपले सरकार हे सर्वात इमानदार सरकार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. विरोधकांनीच आपल्याला हे प्रमाणपत्र दिल्याचेही ते म्हणाले.

दिल्लीतील अनधिकृत कॉलनींना अधिकृत करण्याची घोषणा करणे सोपे आहे. परंतु, प्रत्यक्षात काम करणे कठीण आहे. अशाप्रकारची आश्वासने अनेक पक्षांनी दिली आहेत. ही आमची व्होट बँक नाही. तर आमचे बंधु-भगीनी याठिकाणी राहातात असेही केजरीवाल यावेळी म्हणाले. अशाप्रकारच्या कॉलनींसाठी आम्ही 8 हजार कोटी रुपये खर्च केल्याचेही ते म्हणाले. लोकांना घरबसल्या अनेक प्रकारचे परवाने मिळत असून आयकर प्रमाणपत्रही मिळत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 4,300 नव्या बसेसही आणण्यात येणार आहेत. अपघात कमी झाले असून आतापर्यंत आम्ही 3 हजार लोकांना वाचवले आहे. 35 हजार लोकांना तीर्थयात्रा घडवल्याचेही केजरीवाल म्हणाले.