
गेली अनेक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा 8 सप्टेंबर हा जन्मदिवस. आशा भोसले यांचे 89 व्या वर्षात पदार्पण. या वयात आशा भोसले यांच्या सुरेल सुरांचे चांदणे पुन्हा बरसले आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी एका मराठी चित्रपटासाठी गाणे गायले आहे. जगण्याची ही मजा घेऊया नव्याने…! म्हणत आशाताईंनी चाहत्यांना वाढदिवसांचे जणू रिटर्न गिफ्ट दिले आहे.
आशा भोसले यांनी दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या चित्रपटासाठी बुधवारी रेकॉर्डिंग केले. महेश टिळेकर यांनी सोशल मीडियावर रेकॉर्डिंगचे फोटो शेअर करून याबाबतची माहिती दिली. ‘हवाहवाई’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनंतर आशाताईंनी मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. ‘जगण्याची ही मजा घेऊया नव्याने, जाऊया पुढे पुढे साऱ्यांच्या साथीने.’ असे गीताचे बोल असून पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. आशाताईंमुळे या गाण्याची आणि चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.






























































