
आशा भोसले
यशवंत देव यांच्याशी माझी खूप जुनी ओळख. अगदी 47-48 सालापासून… तेही या क्षेत्रात नवीन आणि मीही नवीन होते, अगदी तेव्हापासूनची. एचएमव्हीमध्ये काम करण्याचा तो काळ असेल. तेव्हापासून माझे ऋणानुबंध जुळले ते अगदी शेवटपर्यंत. त्यांनी मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. ते गाण्यातील बारकावे समजावून सांगायचे. मला म्हणायचं, ‘सा’ लावताना डोळे मिटू नकोस. हातवारे करू नकोस. मी हात हलवल्यावर म्हणायचे, हाताने तान घेतेस का? त्यांची समजवण्याची पद्धतही खूप वेगळी. एकदम स्वच्छ माणूस. चित्तपावनी ब्राह्मण, साधी मसाल्याची भाजीपण त्यांना चालायची नाही. त्यांना भेटल्यावर जणू मोगऱ्याच्या फुलाला भेटल्यासारखं वाटायचं.
देवांनी खूप शिकवलं. माझ्या गाण्यात आणखी काय सुधारणा हव्यात… आणखी कशाची भर टाकली पाहिजे…सतत सांगायचे. ते म्हणायचे, गाणं कधी संपत नसतं. गाणं कधी परिपूर्ण नसतं. त्यांच्यासोबत खूप गाणी केली. त्यातील ‘विसरशील तू खास मला दृष्टिआड होता’ हे गाणं मला फार आवडायचं. त्यांच्या कार्यक्रमात हे गाणं हमखास असायचे. त्यांचा स्वभाव एकदम स्पष्टवक्ता. तोंडावर एक आणि पाठीमागे एक असं बोलणं त्यांना जमायचे नाही. त्यांचा एक किस्सा सांगते, एकदा मी त्यांना प्रश्न केला की तुम्हाला माझा आवाज जास्त आवडतो की लतादीदीचा? एका क्षणात देवसाहेबांनी उत्तर दिले, दीदींचा! त्यांच्या उत्तरामुळे मी भारावून गेले. देवसाहेब पुढे म्हणाले, नैसर्गिकता ही लतादीदींच्या गाण्याची ताकद आहे आणि हिंमत ही तुमच्या गाण्याची ताकद आहे. त्यांचे ते खरे बोलणे मला खूप आवडले होते.
देव यांच्या कुटुंबाशी माझे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. ते माझ्या घरी येताना खरवस घेऊन यायचे. मीही त्यांच्या घरी जेवणाचा डबा पाठवायचे. माझा एक डबा त्यांच्या घरी राहिलाय. त्यांची पत्नी म्हणाली होती, रिकामा कसा द्यायचा, काहीतरी देईन. त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा मी घरी सांत्वनासाठी गेले होते. त्यावेळी देवसाहेब म्हणाले, आता तो डबा तसाच राहू दे माझ्याकडे…. अशा खूप आठवणी आहेत.
देव म्हणजे उत्साहाचा अखंड झरा. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे नव्या पिढीने नुसते चिंतन जरी केले तरी कळेल गाणं काय असतं. त्यांच्या 91 व्या वाढदिवसाच्या एका कार्यक्रमाला आम्ही भेटलो होतो. जेव्हा कधी भेट व्हायची तेव्हा ते म्हणायचे, आपण गाणं करूया. वयाच्या नव्वदीतही जेमाने गायचे, शिकवायचे. माझ्या बंधूना म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना ते खूप मानायचे. बंधूंसाठी त्यांनी कविताही लिहिली आहे.
मधल्या काही दिवसांत देवसाहेबांची भेट घेता आली नाही. याची आता खंत वाटतेय. आपण आपल्या व्यापात असतो, वेळ मिळत नाही. मग कधीतरी अशी दुर्दैवी बातमी कानावर येते. मला वाटत राहतं की, सुरेश भटांना भेटायला हवं होतं. देवसाहेबांना भेटायला हवं होतं. अशी प्रेम करणारी माणसं निघून जाताहेत. आशीर्वाद देणारे हात आपल्यापासून दूर जात आहेत. आमच्यापेक्षा वयाने मोठी अशी दोनच माणसं संगीत क्षेत्रात राहिली आहेत. एक लतादीदी आणि दुसरे खय्याम साहेब. बस्स आणखी काय बोलू!

























































