…तुमसा नही देखा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिबानी जोशी,[email protected]

बिमल रॉय हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक फार संवेदनक्षम चित्रपट निर्मिती करणारे नाव मानले जाते. त्यांनी अनेक समाजवादी चित्रपट बनवले. ‘दो बिघा जमीन’, ‘परिणिता’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’ अशा प्रत्येक चित्रपटात त्यांनी मांडलेला विषय आजही आपल्या देशात प्रश्न बनून उभा आहे. शेतकऱयाच्या समस्या, उच्च-नीच जातीतील लग्न, नववधूचं रूप अशा समस्यांवर त्या काळात चित्रपट काढणं आव्हानात्मकच होतं; परंतु विषय कुठेही भडक न करता अतिशय संवेदनशील, सृजनात्मक पद्धतीनं त्यांनी चित्रपट बनवले आणि मनोरंजनातून संदेश पोहोचवण्याचे काम केले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांची कन्या रिंकी भट्टाचार्य गेल्या 11 वर्षांपासून चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलावंतांना ‘बिमल रॉय स्मृती पुरस्कार’ देतात. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तो जाहीर झाला आहे. त्यानिमित्तानं आशा पारेख यांच्याशी केलेली बातचीत.

1959 ते 1973 या काळातल्या बॉलीवूडच्या सर्वश्रेष्ठ तारकांमधील एक तारका असा आशाजींचा लौकिक आहे. तो काळ त्यांनी अक्षरशः गाजवला. खरं तर हिंदी चित्रपट हिरॉईनला पाहिजे तसा आकर्षक चेहरा, बांधा त्यांच्याकडे नव्हता. पण तो बांधाच त्यांची ओळख बनला होता.

तुम्हाला बिमल रॉय यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे, आपल्या भावना काय आहेत?

मी खरं तर शास्त्रीय नृत्य शिकत होते व वयाच्या 7-8 व्या वर्षापासूनच स्टेज परफॉर्मन्स करीत होते. अशाच एका डान्स शोमध्ये खुद्द बिमल रॉय यांनी मला पाहिलं आणि चित्रपटसृष्टीत बोट धरून अलगद आणून ठेवलं. वयाच्या 8-9 व्या वर्षी बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटात आले. 1952 साली ‘आसमान’, 1954 मध्ये ‘बापबेटी’ या चित्रपटात छोटीशी भूमिका माझ्या वाटय़ाला आली होती.

तबस्सुमच्या मैत्रिणीची भूमिका त्यावेळी मी केली होती. ज्यांनी आपल्याला या झगमगत्या दुनियेत आणलं त्यांच्या नावानी पुरस्कार मिळत आहे. त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे.

तुम्ही उत्कृष्ट शास्त्रीय नृत्यांगना आहात. त्याचा फायदा चित्रपटात काम करताना कसा झाला?

– कथ्थकचे धडे मी मोहनलाल पांडे यांच्याकडे घेत होते. दरम्यान, इलू यांच्याकडे भरतनाटय़मही बऱयापैकी शिकले. गुरुजींच्या एका कार्यक्रमात इच्छा होती की मी कुचीपुडी सादर करावं. म्हणून आचार्यजींकडे तो नृत्यप्रकार शिकले. राघवन् याच्याकडे कथकलीचे प्रशिक्षण घेतले. आचर्यजींकडे थोडं कुचीपुडी शिकले. नंतर केलूचरण महापात्रा यांच्या शिष्यांकडून ओडिसीसुद्धा शिकले. या शिक्षणाचा मला चित्रपटात खूपच उपयोग झाला. त्याकाळी अतिशय अर्थपूर्ण गाणी आम्हाला मिळाली. उत्कृष्ट संगीतकार मिळाले. गाण्याला चित्रपटात खूप महत्त्व होतं. प्रत्येक चित्रपटात मला एका तरी नृत्याची संधी मिळाली.

त्या काळातील शम्मी कपूर, राजेश खन्नासारख्या लोकप्रिय असलेल्या हीरोंबरोबर तुम्हाला काम करायला मिळालं. त्यावेळच्या आणि आत्ताच्या ‘माहौल’बद्दल काय वाटतं?

आज खूप व्यावसायिकता आली आहे, पण आज मी पाहते मोठमोठे कलाकार एका वेळी एकच चित्रपट करतात. त्यामुळे एका अर्थी ‘कमर्शियल ऍप्रोच’ झालाय ते ठीकच आहे.
तुमच्या काळात इनडोअर किंवा देशात बरीच शूटिंग होत असतं. आज अधिकतर चित्रीकरण परदेशात होतं. तुमच्या काळात परदेशी शूटिंग फार कमी होई, पण ‘लव इन टोकियो’ 1966 मध्ये रिलीज झाला. त्याचं शूटिंग जपानला झालं होतं.

तुमचा अनुभव काय?

खूप मजा आली होती. त्यावेळी फारच कमी, हाताच्या बोटावर मोजण्याइतके चित्रपट परदेशात बनले होते. मला प्रथमच जपान पाहायला मिळालं. तिथले लोक अतिशय वक्तशीर होते आणि आजही आहेत. सध्या बाहेर जास्त शूटिंग होतात म्हणजे निर्मात्यालासुद्धा ते बरं पडतं. संपूर्ण वेळ कलाकार तिथे उपलब्ध असतात. मध्ये दुसरे चित्रीकरण, कार्यक्रम असा व्यत्यय नसतो.

सांताक्रुझला जाता-येता आशा पारेख रुग्णालय दिसतं. रुग्णालय उभारावं असं का वाटलं?

माझी लहानपणी डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती. डॉक्टर झाले नाही तर अशी तरी गरजूंची सेवा करावी असं वाटलं. शिवाय माझी आई समाजसेविका होती. मग तीच रुग्णालयाचं काम पाहायची. सध्या आर्थिक स्थितीमुळे जरा अडचणीत आलं आहे. पण आता आम्ही एका संस्थेला ते चालवायला देणार आहोत.

आज कारकिर्दीकडे मागे वळून पाहताना…?

मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा मी स्वतःला नशिबवान मानते. शम्मी कपूर माझा सर्वात आवडता सहकलाकार म्हणता येईल. त्याच्याबरोबर काम करताना खूप आनंद मिळाला, खूप काही शिकता आलं. ते मला अगदी लिपसिंक कसं करायचं इथपासून शिकवायचे.

आशाजी तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण तुम्हाला कोणता वाटतो?

‘दिल देके देखो’ हा माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला. कारण नायिका म्हणून माझा तो पहिलाच चित्रपट होता.