
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी जिल्हापरिषदेसमोर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी कामगार विरोधी व मालकधार्जिणे धोरण राबविणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, महाराष्ट्र आशा वर्कर्स युनियनचा विजय असो, इन्कलाब झिंदाबाद! आयटक झिंदाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली.
आशा, गटप्रवर्तक महिला, शालेय पोषण आहार कामगार आणि अर्धवेळ परिचर यांना दरमहा अठरा हजार रुपये किमान वेतन द्या, सर्व कंत्राटी कामगारांना कायम करा, कामगारविरोधी कायदे करण्याचे कारस्थान बंद करा, महागाई कमी करा आणि बेरोजगार तरुणांना नोकरी द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी झालेल्या सभेमध्ये आयटकच्या कॉ. शंकर पुजारी, कॉ. सुमन पुजारी, रत्नागिरी जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्या प्रतीक्षा खेडेकर यांनी मार्गदर्शन केले.मोर्चाच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. आठले यांना निवेदन देण्यात आले.



























































