मुंबईकर होणार भक्तिरसात चिंब, आषाढीनिमित्त भक्तिमय स्वरसंध्येचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी एकादशीनिमित्त स्वरांनी ओथंबून भरलेली एक भक्तिमय संध्याकाळ अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. निमित्त आहे शनिवार, 1 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता विलेपार्ले पूर्व येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात आयोजित ‘भक्तिरस’ या कार्यक्रमाचे. सर्व आध्यात्मिक आणि संगीतप्रेमी रसिकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदुस्थानी सैन्यदलातील शहीदांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य वीर सेनानी फाऊंडेशनमार्फत केले जाणार आहे.

वीर सेनानी फाऊंडेशन, स्वरनिनाद फाऊंडेशन आणि स्मृतीगंधतर्फे ‘भक्तिरस’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली आणि देवकी पंडित अभंगांचे सादरीकरण करतील. त्यांना पंडित मकरंद पुंडले (ऑर्गन), एस. आकाश (बासरी), अनय गाडगीळ (की बोर्ड), प्रसाद करंबळेकर (तबला), दादा परब (पखवाज) आणि मंदार गोगटे (साईड ऱहीदम) हे साथ देतील.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण अभंगवाणीचे सादरीकरण तर आहेच, पण स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांच्या दिव्या सुरेल आवाजातील प.पू रंगावधूत महाराज कृत दत्तबावन्नी आणि प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज कृत घोरकष्टोद्धरण स्तोत्राचेदेखील यावेळी अनावरण होणार आहे.  डॉ. सच्चिदानंद शेवडे निरूपण करतील तर सिद्धहस्त चित्रकार शेखर साने यांचा कार्यक्रमात विशेष सहभाग आहे. अधिकाधिक रसिकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.