दर्शन रांगेतील शेडमध्ये 12 हजार भाविकांची सोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढीसाठी भाविकांची वाढती संख्या, पावसाची अनिश्चितता लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेत यंदा पत्रा शेडची संख्या वाढवली आहे. यंदा दर्शन रांगेत नवीन 8 शेड्स उभ्या करण्यात येत आहेत. हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दर्शन रांगेत यंदा किमान 12 हजार वारकऱ्यांना पत्राशेडचा निवारा मिळणार असून, या रांगेत उभा राहिल्यानंतर चहा, नाश्ता, जेवण देण्याची व्यवस्था मंदिर समिती करीत आहे.

आषाढी यात्रा हा श्री क्षेत्र पंढरपुरातील सर्वांत मोठा सोहळा असतो. आषाढी यात्रेसाठी किमान 12 ते 15 लाख वारकरी पंढरीत येऊन जातात. त्यापैकी दर्शन रांगेत उभे राहून 6 ते 8 लाख भाविक दर्शन घेतात. दर्शन रांग बऱ्याचवेळा गोपाळपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत म्हणजे सुमारे 5 ते 6 किलोमीटरपर्यंत लांब जाते. आषाढी यात्रेदरम्यान पाऊस येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे रांगेत उभ्या राहणाऱ्या वारकऱ्यांना डोक्यावर पाऊस आणि पायाखाली चिखल, माती अशा परिस्थितीत विठ्ठल दर्शनासाठी थांबावे लागते. भाविकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी अलीकडे मंदिर समितीकडून रांगेत डोक्यावर प्लॅस्टिकचा कागद बांधला जातो आणि काही भागात चिखल होऊ नये, पायाला खडे टोचू नयेत म्हणून मॅट टाकण्यात येत असते.

एका शेडमध्ये किमान 1 हजार ते 1200 भाविक एकावेळी उभ्या राहू शकतात. त्यामुळे दर्शन शेडमध्ये किमान 12 हजार भाविकांची व्यवस्था होणार आहे. तसेच सुमारे 400 मीटर्स लांबीच्या स्काय वॉकवर 2 हजारांहून अधिक वारकरी उभे राहू शकतात. एकूण दर्शन रांगेत 15 हजारांहून अधिक वारकऱ्यांची व्यवस्था होणार आहे. दर्शन रांगेतील वारकऱ्यांना 24 तास पिण्याचे थंड जारचे पाणी उपलब्ध केले जाणार आहे. शिवाय दोनवेळा चहा, नाष्टा आणि खिचडी, जेवणाचीही सोय केली जाणार आहे.

दर्शनरांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना पाऊस आणि उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून यंदा शेडची संख्या 12 केली जाणार आहे. रांगेत मॅट टाकले जाणार असून, 20 जूनपासून गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतेसह कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे- बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती.