
हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाच्या सध्याच्या परिस्थितीत राज्यासह संपूर्ण देशाला सायबर हल्ल्यांचा मोठा धोका आहे. त्यामुळे सायबर सुरक्षेचे धडे घेण्यासाठी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशीष शेलार स्पेनच्या दौऱयावर निघाले आहेत. त्यांच्यासोबत आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुतिया यांना संधी मिळाली आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील आयपीएस अधिकारी आणि सायबरतज्ञ ब्रिजेश सिंग यांना लांब ठेवले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आयओटी सोल्युशन वर्ल्ड काँग्रेस आणि बार्सिलोना सायबर सिक्युरिटी काँग्रेस 2025 ही परिषद 13 ते 15 मे या काळात स्पेनमधील बार्सिलोनामध्ये आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार व खात्याचे सचिव जैन उपस्थित राहणार आहेत. या दौऱयाला 70 लाख रुपये खर्च येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग हे सायबर तज्ञ म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी त्यांनी इस्रायलचा दौरा केला होता. त्यानंतर पेगासिस सॉफ्टवेअरच्या वापरावरून सरकारमध्ये अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यांचा हा दौरा वादात सापडला होता. सध्या त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी आहे. त्याशिवाय सध्या ते परदेशात आहेत. ते 18 किंवा 19 मे रोजी मुंबईत परतणार आहेत. ते सायबरतज्ञ म्हणूनही ओळखले जातात. पण त्यांचा स्पेनच्या दौऱयात समावेश करण्यात आलेला नाही. इस्रायलच्या दौऱयानंतर वाद निर्माण झाले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून स्पेनच्या सायबर परिषदेपासून दूर ठेवण्यात आल्याची मंत्रालयात चर्चा आहे.