
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी मंत्रालयातील कार्यालयातून कामकाजास प्रारंभ केला आणि लेकीला लक्ष्मी मानून टिकटॉकवर व्हिडीओ करणाऱया कोल्हापूरच्या पित्याला पहिला फोन केला आणि बाप-लेकीला भेटायची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्या लहानग्या लेकीचे वडील भारावून गेले.
मूळ कोल्हापूर जिह्यातील रहिवासी असलेले नागेश पाटील यांनी दोन आठवडय़ांपूर्वी नवीन गाडी विकत घेतली. या गाडीची पूजा करताना त्यांनी आपल्या दोन वर्षीय मुलीचे पाय कुंकवात बुडवून लक्ष्मीची पावले म्हणून त्यांची छाप नव्या गाडीच्या बोनेटवर उमटवली होती. नागेश पाटील यांनी हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला होता. लेकीवरील अपार प्रेम व्यक्त करणारा हा व्हिडीओ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करून एक पिता म्हणून आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या. चव्हाण यांनी मंत्रालयाच्या दालनात प्रवेश केल्यावर पहिला फोन नागेश पाटील यांना करत या व्हिडीओ मागील भावनेचे कौतुक केले.





























































