राजकीय सातबाराची दर्पोक्ती करणाऱ्या अशोकरावांना नांदेडच्या मतदारांनी दाखविला हिसका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी । नांदेड

नांदेड जिल्ह्याचा राजकीय सातबारा आपल्याच नावावर असल्याची दर्पोक्ती निवडणुकीच्या प्रत्येक प्रचार सभेत करणारे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदार संघातील मतदारांनी हिसका दाखविला असून, १५ वर्षानंतर भाकरी फिरवत महायुतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी झाले आहेत.

इ.स.२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची लाट असतानाही नांदेडचा गड राखणारे अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या जिल्हा परिषदेवर तसेच महानगरपालिकेवर आपले वर्चस्व सिध्द केले होते. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण पराभूत होणे शक्यच नाही, असा तर्क पत्रकारांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वजण करीत होते.

नांदेड लोकसभा मतदारसंघात दर पंधरा वर्षांनी मतदारांनी चमत्कार घडविला आहे. १९८९ मध्ये डॉ.व्यंकटेश काब्दे यांना निवडून देवून नांदेडच्या मतदारांनी परिवर्तन घडवून आणले होते. त्यानंतर पंधरा वर्षांनी म्हणजे २००४ मध्ये भास्करराव पाटील खतगावकर यांचा पराभव करुन युतीचे उमेदवार डी.बी.पाटील यांनी निवडणूक जिंकली होती. आता बरोबर पंधरा वर्षांनी अशोकराव चव्हाण यांना पराभूत करुन भारतीय जनता पक्षाचे प्रतापराव पाटील चिखलीकर निवडून आले आहेत.

यावेळी महाआघाडीची पहिली प्रचार सभा नांदेडमध्ये घेवून अशोक चव्हाणांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी त्या पहिल्या प्रचार सभेस पक्षप्रभारी मल्लिाकार्जून खरगे, राधाकृष्ण विखे पाटील आणि राजीव सातव यांच्या अनुपस्थितीमुळे गालबोट लागले होते. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा सहभाग काँग्रेसच्या मुळावर आला. माळेगाव यात्रेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभेत बाळासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचे यशपाल भिंगे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर चक्रे वेगाने फिरली. त्यावेळीही बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसच्या नेत्यांनी महाआघाडीत समाविष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु बाळासाहेबांनी काँग्रेसच्या प्रदेशातील नेत्यांशी बोलण्याऐवजी मी काँग्रेस अध्यक्षांशी बोलेन, असा हट्ट धरुन आघाडीत येण्याचे टाळले. वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका काँग्रेसच्या शवपेटीवरील शेवटचा खिळा ठरली.

या निवडणुकीच्या प्रचारात मागच्या निवडणुकीप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. ती सभा प्रचंड होती. परंतु तरीही अशोक चव्हाण यांच्या मतदानावर त्याचा काही परिणाम होणार नाही असेच बोलले जात होते. शिवाय त्यानंतर राज ठाकरे यांच्या सभेमुळे मोदी आणि शहा यांच्या विरोधात वातावरण तयार झाले असल्यामुळे अशोक चव्हाणांना त्याचा फायदा होईल असेही बोलले जात होते. परंतु जनतेच्या मनात वेगळेच होते. नांदेडमध्ये अपराजीत असलेल्या अशोकरावांना अखेर मतदारांनी अस्मान दाखवले.

नांदेड लोकसभा मतदारसंघाचा १९७१ पासूनचा इतिहास लक्षात घेता या मतदारसंघातून जवळ जवळ ४० वर्षे काँग्रेसचीच राजवट राहिली आहे. १९७१ मध्ये व्यंकटराव तरोडेकर ६४.४४ टक्के मते घेवून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे यशवंत आंबेडकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९७७ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे केशवराव धोंडगे ६७.९१ टक्के मते घेवून निवडून आले होते. त्यांनी गो.रा.म्हैसेकर यांचा पराभव केला होता. १९८० मध्ये शंकरराव चव्हाण ५१.८१ टक्के मते घेवून विजयी झाले. त्यानंतर १९८४ मध्ये शंकररावांनी ५९.८५ टक्के मते घेवून विजयाची पुनरावृत्ती केली. त्यानंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी १९८७ मध्ये २ लाख ८३ हजार १९ मते घेवून विजय नोंदविला. त्यानंतर १९८९ मध्ये डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी ४९.२७ टक्के मते घेवून नांदेडचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. १९९१ मध्ये सूर्यकांता पाटील यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे डॉ.डी.आर.देशमुख यांचा पराभव केला. १९९६ मध्ये गंगाधरराव कुंटूरकर यांनी काँग्रेसचा उमेदवार म्हणून ही निवडणूक जिंकली. त्यांना २९.४१ टक्के मते मिळाली. १९९८ मध्ये भास्करराव पाटील खतगावकर यांनी ४७.८१ टक्के मते घेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली. १९९९ मध्ये पुन्हा भास्करराव खतगावकर यांनी काँग्रेसच्या वतीने निवडणूक जिंकली. २००४ मध्ये डी.बी.पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले. २००९ मध्ये पुन्हा एकदा भास्करराव पाटील खतगावकर यांनी निवडणूक जिंकली. २०१४ मध्ये अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या तिकीटावर ही निवडणूक जिंकली.