
नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नाशिकमधील ज्योतिषी अशोक खरात याने शंभरहून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडीओ समोर आल्याने संपूर्ण हिंदुस्तान हादरला आहे. या पार्श्वभूमीवर विजय कुंभार यांनी खरातची कुंडली मांडताना सांगितले की, आरोपी खरात आणि रुपाली चाकणकर यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. खरातच्या ट्रस्टला मोठ्या प्रमाणावर पाणी दिले असून आणखी ३९ लाख लिटर पाणी देण्याचा प्रस्तावही विचाराधीन होता. विशेष म्हणजे, ज्या महिलांनी खरातविरोधात तक्रारी दिल्या किंवा ज्यांनी या बातम्या प्रसिद्ध केल्या, त्यांना चाकणकर यांनी दमदाटी केल्याचा खळबळजनक आरोपही कुंभार यांनी केला आहे.
कुंभार पुढे म्हणाले की, आरोपी खरातचे वजन इतके मोठे होते की पोलीस देखील गुन्हेगारांना पकडण्यासाठी या बाबाची मदत घेत असत. अनेक बडे अधिकारी आणि राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोंमुळेच त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत कोणी करत नव्हते. रुपाली चाकणकर यांचा या भोंदू बाबाशी असलेला संबंध पाहता, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, त्या अजूनही पदावर असणे हे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच कठोर पाऊल उचलून चाकणकर यांना पदावरून त्वरित हाकलून द्यावे, अशी मागणी विजय कुंभार यांनी केली आहे.




























































