
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये ऊर्फ मुळ्येकाका त्यांच्या एकापेक्षा एक हटके संकल्पनांच्या कार्यक्रमांसाठी ओळखले जातात. आताही एक अनोखा कार्यक्रम घेऊन ते भेटीला येणार आहेत.
100व्या नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरील हे साडे99वे नाट्य संमेलन असेल. यामध्ये नाटककारांचा स्नेहमेळा आयोजित करण्यात आला असून मुळ्येकाकांनी निमंत्रित केलेल्या निवडक नाट्य लेखक, मालिका लेखकांचा सहभाग असेल. दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये मंगळवार 8 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 ते रात्री 9 या वेळेत हा स्नेहमेळा होणार आहे.
नाट्य संमेलनाचं यंदाचं शतक महोत्सवी वर्ष आहे याचं औचित्य साधून मुळ्ये यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. नाट्य परिषदेकडून 100वं नाट्य संमेलन आयोजित करण्यात येईल याचा विश्वास आहे. त्याच्या आधीचं हे पाऊल असल्याने हे साडे 99 वं संमेलन असणार आहे, असे मुळ्ये यांनी सांगितले.
सध्या कोरोना काळामुळे रंगभूमीवरही शांतता आहे. त्याच रंगभूमीला थोडी संजीवनी देण्यासाठी मुळ्ये यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारण्यात आला आहे. म्हणूनच शाळा, कॉलेजसारखं गेट टुगेदर असंच कार्यक्रमाचं स्वरूप आहे.
ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांच्यासह निमंत्रित नाट्यलेखकांचा यामध्ये सहभाग असणार आहे. कार्यक्रमामध्ये मुळ्येकाका सांगतील त्याच वक्त्यांची भाषणं होतील. अध्यक्षही आयत्या वेळी निवडला जाईल. सत्कारमूर्तींची निवडही त्याच वेळी केली जाईल. लग्नसोहळ्यासारख्या श्रीखंड-पुरीच्या पंगतीमधील स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित कलाकारच निमंत्रितांना आग्रहाने जेवण वाढतील.
ज्येष्ठ लेखक रवींद्र आवटी आणि दामोदर हॉलच्या संचालिका सीमा वैद्य हे या कार्यक्रम आयोजनाचे दोन प्रमुख आधारस्तंभ आहेत.
आवटी यांच्याकडून हॉलच्या भाडय़ाचा खर्च तर सीमा वैद्य यांच्यातर्फे भोजन व्यवस्था खर्च केला जाणार आहे, असे मुळ्ये यांनी सांगितले. कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.
संगीत मैफलही रंगणार
कार्यक्रमात संगीत मैफलीचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नीलिमा गोखले, केतकी भावे-जोशी, जयंत पिंगुळकर आणि श्रीरंग भावे यांचा समावेश असणार आहे. संगीत संयोजन प्रशांत लळित यांचं आहे.




























































