आष्टय़ातील छत्रपती शिवरायांच्या पुतळा प्रतिष्ठापनेचा वाद मिटला, जिल्हा प्रशासनाकडून ‘ती’ जागा पालिकेकडे वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आष्टा शहरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी शहरात 144 कलम लागू केले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य पाहून मंगळवारी रात्री उशिरा पुतळ्याची जागा पालिकेकडे हस्तांतरित केल्याचे लेखी पत्र दिले. त्यामुळे हा तणाव निवळला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न 8 दिवसांत दोनवेळा झाला होता. त्यामुळे आष्टा शहरात 2 दिवसांत पुतळा उभारण्यावरून वातावरण तापले होते. शिवप्रेमींनी पुतळा उभारलेल्या ठिकाणी महाआरतीचे मंगळवारी सायंकाळी आयोजन केले होते. मात्र, पोलिसांनी महाआरतीसाठी उभारलेला मंडप हटवत पुतळा परिसरात कलम 144 लागू केले. त्यानंतर शिवप्रेमी पुतळ्याजवळ ठिय्या मारून बसले. प्रशासनासोबत झालेली चर्चा फिस्कटली आणि शिवप्रेमींनी आक्रमक होत दूधगाव फाटा येथे ठिय्या मारला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि मध्यरात्री पुतळा काढायला सुरुवात केली.

या दडपशाहीच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी ईश्वरपूरसह वाळवा तालुका बंदची हाक दिली. पुतळा हटवलेल्या ठिकाणी बंदोबस्त तसाच होता. शिवाय आष्टा शहरात तणावपूर्ण शांतता होती. तणावपूर्ण परिस्थिती पाहून सांगली जिल्हा प्रशासनाकडून आष्टा विकास आराखडय़ानुसार बगीचा विकास करण्यास मंजुरी देत जिल्हाधिकाऱयांनी ती जागा हस्तांतरित केल्याचे पत्र पालिकेला दिले आहे. आष्टा नगरपालिकेचा बगीचा व पुतळ्यासाठी यापूर्वीच ठराव झाला होता. यावर आता मंगळवारी पुतळा बसवलेल्या शिवप्रेमी गटाने पेढे वाटत जल्लोष केला. दुसरीकडे आष्टा शहरात पुतळ्यासाठी स्थापन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीनेदेखील जल्लोष करत आता लवकरच थाटामाटात पुतळा बसवू असे म्हटले आहे.