
>> प्रा. आशुतोष पाटील
सिंधू किंवा हडप्पा संस्कृतीतील ज्ञात झालेली सर्वप्रथम स्थळे म्हणजे हडप्पा आणि मोहेंजोदाडो. त्यानंतर सलग चालू असलेल्या संशोधनात भारताच्या विविध भागांत शेकडो छोटी-मोठी हडप्पा संस्कृतीशी संबंधित असलेली पुरातत्वीय स्थळे सापडली. या सभ्यतेतील भारतातील एक सर्वात मोठे पुरातत्वीय स्थळ म्हणजे ‘धोलावीरा’.
गुजरातमधील कच्छचे रण हा एक अद्भुत प्रदेश आहे, ही जागा समुद्रसपाटीपासून जवळ असल्याने येथे पाण्याची पातळी कमी-अधिक होत राहते. कधी रण पूर्णपणे पाण्याने भरून जाते, तर कधी वाळवंट बनून राहते. ऋतूनुसार होणारे बदल यावरही प्रभाव पाडत राहतात. या कच्छच्या रणात एक बेट आहे, ज्याला ‘खाडीर’ नावाने ओळखले जाते. याच बेटावर स्थित आहे सिंधू संस्कृतीचे वाहक असलेले एक अद्भुत पुरातत्वीय स्थळ ‘धोलावीरा’. जे सुमारे 4500 वर्षांपूर्वीचे आहे. हे शहर सिंधू संस्कृतीच्या पाच सर्वात मोठय़ा शहरांपैकी एक आहे आणि त्याचे उत्कृष्ट नगर नियोजन, जल व्यवस्थापन प्रणाली व समृद्ध पुरातत्त्वीय अवशेषांसाठी ओळखले जाते. 2021 मध्ये युनेस्कोने धोलावीराला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले, ज्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले आहे.
सिंधू किंवा हडप्पा संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक मानली जाते. आजच्या 100 वर्षांपूर्वी ज्ञात झालेली ही संस्कृती अजूनही पूर्ण कळू शकलेली नाही. या सभ्यतेची सर्वप्रथम ज्ञात झालेली स्थळे म्हणजे हडप्पा आणि मोहेंजोदाडो (आता पाकिस्तान मध्ये आहेत). त्यानंतर सलग चालू असलेल्या संशोधनात भारताच्या विविध भागांत शेकडो छोटी-मोठी हडप्पा संस्कृतीशी संबंधित असलेली पुरातत्वीय स्थळे सापडली. ही सभ्यता मुख्यत भारताच्या हरयाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात पसरलेली होती.
या सभ्यतेतील भारतातील एक सर्वात मोठे पुरातत्वीय स्थळ म्हणजे ‘धोलावीरा’. 1967-68 मध्ये पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे जे. पी. जोशी यांना धोलावीरा हे पुरातत्वीय स्थळ असल्याचे आढळून आले. त्यानंतर 1989 ते 2005 या काळात डॉ. रवींद्र सिंग बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली येथे 13 वेळा सविस्तर उत्खनन करण्यात आले. या उत्खननामुळे हडप्पा संस्कृतीच्या अनेक नवीन पैलूंची माहिती मिळाली, ज्यात शहराचे नियोजन, वास्तू कला आणि विविध कलाकृतींचा समावेश आहे. हे भव्य शहर साधारणत इ. स. पू. 2500 ते इ. स. पू 1900 या काळात उभे राहिले असावे. असे असले तरी यापूर्वी आणि यानंतरही लोक येथे राहत असावे असे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. येथे उत्खननात सापडलेल्या वस्तू हडप्पा-मोहेंजोदडो येथे सापडलेल्या वस्तूंशी साधर्म्य दाखवतात.
धोलावीराची नगर रचना अत्यंत वैशिष्टय़पूर्ण होती. हे शहर तीन मुख्य भागांमध्ये विभागलेले होते – उंचवटय़ावरील वस्ती , मधले शहर आणि खालचे शहर. शहराभोवती मजबूत तटबंदी होती आणि प्रवेशासाठी भव्य दरवाजे होते. बांधकामासाठी दगडांचा मोठय़ा प्रमाणावर वापर हे धोलावीराचे वैशिष्टय़ आहे, जे इतर हडप्पाकालीन शहरांमध्ये क्वचितच आढळते.
धोलावीराची सर्वात प्रभावी बाब म्हणजे तेथील अत्याधुनिक जल व्यवस्थापन प्रणाली. पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि त्याचा वर्षभर वापर करण्यासाठी येथे 16 पेक्षा जास्त मोठे जलाशय बांधण्यात आले होते. मन्सर आणि मनहर या दोन नद्यांमधून पाणी शहरात आणले जात असे. ही प्रणाली हडप्पाकालीन लोकांच्या अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. येथील उत्खननात विविध प्रकारच्या कलाकृती सापडल्या आहेत. यात तांबे, शिंपले, दगड, अर्ध-मौल्यवान खडे, टेराकोटा, सोने आणि हस्तिदंत यांपासून बनवलेले दागिने व मणी यांचा समावेश आहे. लाल आणि काळ्या रंगाची मातीची भांडी, वजन आणि मापे, प्राण्यांची हाडेदेखील मोठय़ा संख्येने मिळाली आहेत.
धोलावीरामधील सर्वात महत्त्वपूर्ण शोधांपैकी एक म्हणजे शहराच्या उत्तर दरवाजाजवळ सापडलेली दहा मोठय़ा चिन्हांची पाटी. ही पाटी सुमारे 3 मीटर लांब असून प्रत्येक चिन्ह सुमारे 37 सेंटिमीटर उंच आहे. जिप्सम या खनिजापासून बनवलेली ही चिन्हे एका लाकडी फळीवर लावलेली होती. काळाच्या ओघात लाकूड नष्ट झाले, पण चिन्हांची रचना कायम राहिली. ही चिन्हे हडप्पा लिपीचा भाग असून ही जगातील सर्वात जुनी ‘साइन बोर्ड’ मानली जाते. याचा उपयोग शहरात येणाऱयांसाठी सूचना देण्यासाठी किंवा शहराची ओळख म्हणून होत असावा, असा अंदाज आहे. जोपर्यंत हडप्पा लिपीचे पूर्णपणे वाचन होत नाही, तोपर्यंत या पाटीवरील संदेशाचे रहस्य कायम राहील.
धोलावीरा हे केवळ एक प्राचीन शहर नाही, तर ते हडप्पा संस्कृतीचे एक महत्त्वाचे व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र होते. गुजरात, सिंध, पंजाब आणि पश्चिम आशियातील इतर शहरांशी त्याचे व्यापारी संबंध होते, हे उत्खननात मिळालेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होते. मेसोपोटेमिया आणि ओमानसोबतच्या व्यापाराचे पुरावेही येथे सापडले आहेत. या शहराचे नगर नियोजन, संरक्षण व्यवस्था आणि विशेषत जल व्यवस्थापन प्रणाली, हडप्पाकालीन लोकांच्या प्रगत विचारांची आणि तंत्रज्ञानाची साक्ष देतात. धोलावीरामुळे हडप्पा संस्कृतीच्या शहरीकरणाच्या प्रक्रियेबद्दल आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल अधिक सखोल माहिती उपलब्ध झाली आहे.
धोलावीराच्या ऱ्हासाची अनेक कारणे असू शकतात, ज्यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटक जसे नद्यांचे बदलेले प्रवाह, कोरडय़ा पडलेल्या नद्या, हवामानात झालेला बदल, दुष्काळ आणि यामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम या कारणांमुळे धोलावीरासारखे एक समृद्ध शहर हळूहळू ओस पडले आणि काळाच्या पडद्याआड गेले. तरीही त्याचे अवशेष आजही हडप्पा संस्कृतीच्या भव्यतेची आणि प्रगत तंत्रज्ञानाची साक्ष देतात.
धोलावीरा हे भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाल्यामुळे या स्थळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे आणि जगभरातील संशोधक, पुरातत्त्वज्ञ आणि इतिहासप्रेमींसाठी हे एक महत्त्वाचे अभ्यास केंद्र बनले आहे. धोलावीराचे जतन आणि संवर्धन हे आपल्या प्राचीन इतिहासाला समजून घेण्यासाठी व भविष्यातील पिढय़ांसाठी हा अनमोल ठेवा जपण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)
[email protected]

























































