मुंबई मेट्रोची धुरा रणजितसिंह देओल यांच्याकडे, तुकाराम मुंढे नागपुरात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र विकास आघाडीने जनहिताच्या निर्णयाचा सपाटा लावला असतानाच हे निर्णय मार्गी लावण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्या जात आहेत. मागील आठवडय़ात 22 अधिकाऱयांच्या नियुक्त्यांनंतर आज 20 सनदी अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून अश्विनी भिडे यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी एस.टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक रणजितसिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.

एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक असलेले तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मानले जातात. राज्य सरकारने मुंढे यांना नागपुरात पाठवून फडणवीसांच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात अडकवल्याची चर्चा आज मंत्रालयात होती. त्याच वेळी मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव राजीव निवतकर हे मुंबईचे जिल्हाधिकारी झाले आहेत.

राज्य सरकारने मंगळवारी केलेल्या बदल्यांमध्ये एमपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद कुमार यांची ग्रामीण विकास आणि जलसंधारण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डी. टी. वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्युत पारेषणच्या संचालकपदी असलेल्या पराग जैन-नैनुत्तीया यांना सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे. मत्स्यविभाग आयुक्त आर. आर. जाधव यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सचिवपदी करण्यात आली आहे. तर उत्पादनशुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांना मराठी भाषा विभागच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे. पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय सचिव एस. एस. डुंबरे यांची मेडाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे भूमिअभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांची नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे जिल्हाधिकारी एस.आर. जोंधळे यांची सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मेडाचे महासंचालक के. बी. उमप यांची उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ए. ई. रायते यांची अतिरिक्त आयुक्त जमावबंदी आणि भूमिअभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रीकर सहआयुक्त म्हणून संपदा मेहता यांची तर अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तर पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यू. ए. जाधव यांना अकोल्यात नियुक्त करण्यात आले आहे. कृषिविभागाचे उपसचिव किरण पाटील यांना सामान्य प्रशासन सचिव कार्यालयाचे उपसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

  • पुणे साखर आयुक्त एस. एन. गायकवाड यांना पुणे महापालिका आयुक्त तर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महानिरीक्षक ए. एम. कवडे यांना सहकार सोसायटय़ांच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी साखर आयुक्त म्हणून पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.