
पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे वादग्रस्त म्हणून ओळखल्या जात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्याचे कामकाज आता वेगात सुरू झाले आहे. पनवेलच्या सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात आज चार तास मॅरेथॉन सुनावणी झाली. न्यायालयाने या खटल्यातील मुख्य साक्षीदार अश्विनी यांचे पती राजू गोरे यांची सरतपासणी शुक्रवारी एकाच दिवसात उरकून त्यांची उलटतपासणीही सुरू केली.
अश्विनी बिद्रे हत्याकांडातील पहिले साक्षीदार आणि अश्विनी यांचे भाऊ आनंद बिद्रे यांची सर आणि उलटतपासणी पनवेल न्यायालयात सुमारे दोन ते अडीच महिने सुरू होती. ती संपल्यानंतर दुसरे साक्षीदार राजू गोरे यांची सर आणि उलटतपासणी सुरू झाली. मात्र त्यांनी तत्कालीन सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्या न्यायालयात नकार दिला. त्यामुळे हा खटला सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आला. आज झालेल्या सुनावणीला राजू गोरे यांची सरतपासणी पूर्ण करण्यात आली आणि कोणतीही सबब ऐकून न घेता न्यायाधीशांनी उलटतपासणी सुरू केली. या खटल्याची सुनावणी आता येत्या 6 मार्च रोजी होणार आहे.
आरोपींची ओळखपरेड
या खटल्यातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांची आज पनवेल सत्र न्यायालयात ओळखपरेड घेण्यात आली. अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी या दोन्ही आरोपींना ओळखले. खटल्याचे कामकाज वेगात सुरू झाल्यामुळे येत्या ऑक्टोबरपर्यंत याचा निकाल लागणार असल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात सुरू झाली आहे.






























































