बिहारच्या पुराला हस्त नक्षत्रातला पाऊस जबाबदार, केंद्रीय मंत्र्यांचा अजब तर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये सध्या पुराने थैमान घातलं आहे. तब्बल 29 जणांचा बळी घेणाऱ्या या पुराला हस्त नक्षत्रातला पाऊस जबाबदार असल्याचा अजब तर्क केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी मांडला आहे.

बिहार 66 लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले असून त्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या 19 तुकड्या कार्यरत आहेत. हवामान विभागाने 14 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रस्त्यांवर जवळपास सात फुटांपर्यंत पाणी साचलं असू जिथे गाड्या धावत होत्या त्याच रस्त्यांवर होड्या तरंगताना दिसत आहेत.  आतापर्यंत 26 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि माजी मुख्यमंत्री सतेंद्र नारायण सिंह तसंच जीतन राम मांझी यांच्या घरातही पुराचं पाणी शिरलं आहे.

या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना अश्विनी चौबे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये पुराने हाहाकार माजला आहे. या पूरस्थितीला हथिया नक्षत्रातला (हस्त नक्षत्र) मुसळधार पाऊस जबाबदार आहे. त्यामुळे पावसाने नैसर्गिक संकटाचं रूप धारण केलं आहे. सरकार या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्णतः समर्थ आहे, असं विधान चौबे यांनी केलं आहे.

चौबे यांच्या या वक्तव्यावर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेता तेजस्वी यादव यांनी टीका केली आहे. पाटणा शहरात गेली 15 वर्षं महापौरपद, पाच आमदार आणि पाच खासदार भाजपचेच आहेत. बिहारमध्ये गेली 15 वर्षं एनडीएचं सरकार आहे. आता या पुरासाठी नीतिश कुमार, सुशील कुमार मोदी यांनी मुघल, जवाहरलाल नेहरु, लालू यादव, हवामान, निसर्ग आणि नक्षत्राला दोष द्यायला हवा, अशी टीका यादव यांनी केली आहे.