
क्रिकेटमध्ये आशियाई देशांचा दबदबा वाढतोय, हे लपलेले नाही. वर्ल्ड कपमध्ये यंदा दहा संघ खेळत असून त्यापैकी निम्मे म्हणजे पाच संघ आशियाई आहेत. आधीच हिंदुस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेच होते. आता श्रीलंकेचेही नाव त्यात जोडले गेले आहे.वर्ल्ड कपमधले आशियाई संघ असेच वाढत राहिले तर लवकरच वर्ल्ड कप आणि आशिया कपमधला फरक संपून जाईल.
1975 सालापासून क्रिकेटच्या वर्ल्ड कपचा प्रारंभ झाला. पहिल्या स्पर्धेत एकूण आठ संघ खेळले. त्यापैकी तीन संघ आशियाई संघ होते. ते तीन संघ गेल्या 14 स्पर्धांतही कायम आहेत. पहिल्या चार वर्ल्ड कपमध्ये म्हणजे 87 सालापर्यंत आठच संघ खेळले होते. 1992 साली प्रथमच 9 संघ खेळविण्यात आले. त्यात दक्षिण आफ्रिका या आफ्रिकन संघाचा समावेश करण्यात आला.
1996 साली झालेल्या स्पर्धेत 12 संघांना खेळविण्यात आले आणि तेव्हा त्यात चार आशियाई संघांचा समावेश होता. यूएई हा चौथा आशियाई संघ वर्ल्ड कपमध्ये खेळला. तेव्हा दक्षिण आफ्रिका, केनिया आणि झिम्बाब्वे हे तीन आफ्रिकन संघही खेळले. 1999 सालीसुद्धा संघांचा आकडा 12 इतकाच होता आणि आशियाई संघही चार होते. पण यूएईची जागा बांगलादेश या नव्या संघाने घेतली होती. 2003 साली वर्ल्ड कपमध्ये 14 संघ खेळविण्यात आले, पण तेव्हाही चार आशियाई आणि 3 आफ्रिकन संघ कायम होते. 2007 सालच्या वर्ल्ड कपमध्ये अचानक 16 संघांना संधी देण्यात आली तेव्हाही आशियाई संघ चारच होते. या वर्षी युरोपियन संघांचा आकडा आश्चर्यकारकरीत्या चार झाला होता. 2011मध्ये संघांचा आकडा दोनने कमी करण्यात आला. तेव्हाही चारच आशियाई संघ होते. या वर्षी 3 आफ्रिकन आणि 3 युरोपियन संघही खेळले. 2015च्या वर्ल्ड कपमध्येही 14 संघ खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला, पण यावेळी 4 नव्हे 6 आशियाई संघ होते. आयसीसी पात्रता फेरीतून यूएईला संधी मिळाली तर जागतिक लीग स्पर्धेतून अफगाणिस्तान या नवख्या संघाची एण्ट्री झाली. 14 पैकी 6 आशियाई संघ असले तरी हा आकडा निम्मा नव्हता, पण 2019 साली केवळ दहा संघ खेळविण्याचा नियम आखण्यात आला. संघांचा आकडा कमी केला तरी आशियाई संघांचा आकडा या स्पर्धेत वाढला. आधीच्या चार संघांबरोबर अफगाणिस्तानही वर्ल्ड कपमध्ये स्थिरावला. त्यामुळे दहापैकी पाच संघ आशियाई होते. वर्ल्ड कपमध्ये निम्मे संघ आशियाई असण्याची ही पहिलीच वेळ होती.
यंदा आशियाई संघ कमी होतील असे वाटत होते, पण श्रीलंकेने वर्ल्ड कपमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे वर्ल्ड कपचे निम्मे संघ आशियाई आहेत, हे सांगण्याची गरज नाही, मात्र यावेळी वेस्ट इंडीज संघ नसल्यामुळे एकही अमेरिकन संघ नाही. तसेच झिम्बाब्वे अपात्र ठरल्यामुळे दक्षिण आफ्रिका हा एकमेवच आफ्रिकन संघ उरला आहे. त्याचप्रमाणे दहाव्या संघाचा फैसला स्कॉटलंड-नेदरलॅण्ड्समधून ठरणार असल्यामुळे इंग्लंडच्या जोडीला आणखी एक युरोपियन संघ असेल. क्रिकेटमध्ये अन्य संघांची ताकद न वाढल्यास 2027 मध्ये आशियाई संघांचा आकडा वाढू शकतो. सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कप पात्रता फेरीत नेपाळ आणि ओमानसारख्या आशियाई संघांनीही चांगली कामगिरी केली आहे. यापैकी एक संघ 2027 मध्ये दिसला तर वर्ल्ड कपचा आशिया कप व्हायला फार वेळ लागणार नाही.



























































