आशिया कपमध्ये हिंदुस्थानींचाच आवाज; फलंदाजीत अभिषेकचा झंझावात, तर गोलंदाजीत कुलदीपची फिरकी

आशिया कपमध्ये हिंदुस्थानी संघानेच मैदान गाजवले. सलग सात विजयांसह हिंदुस्थान अपराजित विजेता ठरत नवव्यांदा बाजी मारली. तसेच फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, नाहीतर क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रांत हिंदुस्थानी खेळाडूंचाच बोलबाला होता. पण याच गोंधळाच्या पार्श्वभूमीवरही जिथे युवा खेळाडूंनी आपला अफलातून खेळ दाखवला तिथे काही दिग्गज खेळाडूंना सूरच गवसला नाही. काहींच्या चेंडूंना विकेटचे यश लाभले नाही.

आशिया कप सर्वार्थाने हिंदुस्थानचाच होता. इथे दुसऱ्या कोणत्याही संघाची चालली नाही. शेवटचे दोन सामने वगळता या स्पर्धेतील सामनेही कंटाळवाणे आणि एकतर्फी झाले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांपैकी निम्मे संघ बालवाडीतल्या विद्यार्थ्यांसारखे असल्यामुळे स्पर्धेतून थरारच नाहीसा झाला होता. मात्र स्पर्धेत संभाव्य विजेत्यांच्या यादीत दुसरा असलेला अफगाणिस्तान अनपेक्षितपणे साखळीतच बाद झाला. ही स्पर्धा टी-20
फॉरमॅटमध्ये खेळली गेली, पण यात अपेक्षित फटकेबाजीही दिसली नाही.

स्पर्धा गाजवली ती हिंदुस्थानच्या अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादवने. अभिषेकने स्पर्धेत सर्वाधिक 3 अर्धशतके झळकवताना सर्वाधिक 314 धावा ठोकल्या. त्याच्याच बॅटीतून सर्वाधिक 19 षटकार आणि सर्वाधिक 32 चौकार बरसले. अन्य एकही खेळाडू त्याच्या आसपास नव्हता. फक्त त्याला आपल्या तिन्ही सत्तरीतल्या खेळींना शतकात रूपांतरीत करता आले नाही. विशेष म्हणजे, अभिषेकने 200 च्या स्ट्राईकरेट म्हणजे 157 चेंडूंत 314 धावा केल्या. पूर्ण स्पर्धेत त्याच्याइतका भन्नाट स्ट्राईकरेट एकाही फलंदाजाचा नव्हता. फलंदाजीनंतर गोलंदाजीतही हिंदुस्थानच्या कुलदीपने धम्माल केली. त्याने दोनदा चार आणि चार वेळा तीन विकेट घेत 9.29 धावांच्या सरासरीने 17 विकेट टिपल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 10 विकेटसह शाहीन शाह आफ्रिदी होता.

स्पर्धेत एकमेव शतकी खेळी श्रीलंकेच्या पथुम निसांकाने केली. त्याने हिंदुस्थानविरुद्ध सुपर-4 मध्ये 107 धावा झळकवल्या, पण तरीही संघाला विजय मिळवता आला नाही. हिंदुस्थानने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. निसांकाने 261 धावा करत दुसरे स्थान मिळवले. त्याच्या खालोखाल साहिबजादा फरहान (217) आणि तिलक वर्मा (213)यांनी धावा केल्या.

सूर्याची धावांची आग शांत

टी-20 क्रिकेटचा बादशहा असलेला कर्णधार सूर्यकुमार यादव आशिया कपमध्ये पूर्णपणे अपयशी ठरला.  त्याने सात सामन्यांत फक्त 72 धावा केल्या, ज्यातील सर्वोच्च खेळी नाबाद 47 धावांची होती. उपकर्णधार शुभमन गिल यालाही सातत्य सापडले नाही. सात सामन्यांत त्याच्या नावावर फक्त 127 धावा जमा झाल्या. दोघेही केवळ एकाच डावात खेळले आणि अन्य डावात पुरते अपयशी. या तुलनेत तरुण तिलक वर्मा हा हिंदुस्थानसाठी स्पर्धेतील मोठा नवा तारा ठरला. त्याने सात सामन्यांत 213 धावा केल्या. अंतिम सामन्यात जेतेपद खेचून आणणारी नाबाद 69 धावांची खेळी हीच त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली.