
आशिया कप पुरुष हॉकी स्पर्धेत आज हिंदुस्थानने जपानवर 3-2 अशी निसटती मात करत गटातील आपले वर्चस्व अधिक भक्कम केले. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन झंझावाती गोलांमुळे संघाला विजय मिळाला, तर गोलकीपर कृष्ण बहादूर पाठकने आपल्या करिअरमधील 150 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत ऐतिहासिक टप्पा गाठला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच हिंदुस्थानी संघाने आक्रमक खेळ दाखवून जपानवर दबाव आणला होता. निर्णायक क्षणी हरमनप्रीतने दोन गोल आणि संघाच्या एकजुटीच्या खेळामुळे हिंदुस्थानने सलग दुसरा विजय आपल्या नावावर केला. या निकालामुळे त्यांची उपांत्यपूर्व फेरीतील दावेदारी आणखी मजबूत झाली आहे.
दरम्यान, दुसऱया सामन्यात मलेशियाने दक्षिण कोरियाला 4-1 असा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधले. मलेशियाच्या अनुआर यांनी शानदार हॅटट्रिक नोंदवली. तसेच बांगलादेशनेही 8-3 असा प्रबळ विजय मिळवून स्पर्धेत स्वतःचा ठसा उमटवला.
हिंदुस्थानचा अनुभवी गोलकिपर पाठक यांनी जपानविरुद्धच्या सामन्यात आपली 150 सामन्यांची कारकीर्द पूर्ण केली. प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहून राष्ट्रीय संघाचा कणा बनलेल्या पाठक यांचा प्रवास युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे. सलग दोन विजयांमुळे हिंदुस्थानचे मनोधैर्य उंचावले असून पुढील सामने अधिकच थरारक ठरणार आहेत.


























































