…तरीही टीम इंडिया सर्वात अनुभवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने आशिया कपसाठी आपला 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. याच संघातील बहुतांश खेळाडू आता वर्ल्ड कपमध्येही असतील. 2019 साली वर्ल्ड कप खेळलेल्या संघातील 8 खेळाडू आताही कायम असल्यामुळे हिंदुस्थानचा संघ सर्वात अनुभवी असेल, हे निश्चित आहे.

2019 साली इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेत कोहलीसह रोहित शर्मा, के.एल. राहुल, रवींद्र जाडेजा, हार्दिक पंडया, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी हे आठ जण खेळले होते, जे आताही कायम आहेत. मात्र महेंद्रसिंह धोनीसह शिखर धवन, केदार जाधव, मयांक अगरवाल, युझवेंद्र चहल, विजय शंकर, भुवेनश्वर कुमार, दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत हे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये नाहीत. पंत आणि चहलचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंचे संघात पुनरागमन कठीण आहे.

आशिया कपसाठी निवडण्यात आलेले बहुतांश खेळाडू वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करतील, हे निश्चित आहे. तरीही आशिया कपमधील कामगिरीच्या आधारे काही खेळाडूंना बाहेरचा रस्ताही पकडावा लागू शकतो. असे असले तरी हिंदुस्थानचाच संघ सर्वात अनुभवी असेल.

हिंदुस्थानी संघात खेळत असलेल्या गिलसह सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, इशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन यापैकी किती जणांना वर्ल्ड कपमध्ये प्रथमच खेळण्याचे भाग्य लाभेल, हे आशिया कपनंतरच निश्चित होईल.

वर्ल्ड कपचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत.
युझवेंद्र चहल फलंदाजीत काहीसा कमी असल्यामुळे कुलदीप यादवचे नाव निश्चित झाले. पण जर उद्या आम्हाला चहलची गरज भासली तर आम्ही त्याला पुन्हा संघात घेऊ. हाच नियम अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदरसाठीसुद्धा लागू असेल. वर्ल्ड कपचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. आशिया कपच्या कामगिरीनुसार संघात काही बदल केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आज हिंदुस्थानचा कर्णधार रोहित शर्माने दिले. त्यामुळे या 17 सदस्यीय संघात एक-दोन बदल नक्कीच होतील, असा अंदाज आहे.