
एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) हिंदुस्थानातील शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सुमारे 86 हजार कोटी रुपये गुंतवण्याची 5 वर्षांची योजना जाहीर केली आहे. ही योजना मेट्रो रेल्वे विस्तार, प्रादेशिक जलद संक्रमण कॉरिडॉर आणि पाणी, स्वच्छता, गृहनिर्माण यासारख्या शहर-स्तरीय सेवांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
हिंदुस्थान दौऱ्यावर असलेले एडीबीचे अध्यक्ष मसातो कांडा यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर याची माहिती दिली. ते म्हणाले, या योजनेत सार्वभौम कर्जे, खासगी क्षेत्र निधी आणि तृतीय-पक्ष भांडवल यांचा समावेश असणार आहे. ही गुंतवणूक हिंदुस्थानच्या शहरीकरण धोरणाला पाठिंबा देणार आहे. 2030 पर्यंत 40 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही शहरात राहणार असून त्यांना पायाभूत सुविधा देण्याचे हिंदुस्थानचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, कांडा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री मनोहर लाल यांच्याशी मेट्रो नेटवर्कचा विस्तार, ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) जोडणे आणि छतावरील सौर क्षमता वाढवण्याबाबत चर्चा केली.



























































