आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा; हिंदुस्थान 72 पदकांसह नवव्या स्थानावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जकार्ता

हिंदुस्थानच्या ऍथलीटस्नी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये संस्मरणीय कामगिरी केल्यानंतर आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्येही त्याची पुनरावृत्ती केली. येथे रंगलेल्या या मानाच्या स्पर्धेत हिंदुस्थानने 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 33 कास्य पदकांसह एकूण 72 पदकांवर मोहोर उमटवत इतिहास रचला. 2014 च्या स्पर्धेत हिंदुस्थानाने 3 सुवर्ण, 14 रौप्य आणि 16 कास्य अशी 33 पदकांची कमाई केली होती.

हिंदुस्थानच्या खेळाडूंनी शनिवारी अखेरच्या दिवशीही दोन सुवर्णपदकांची कमाई केली. पुरुषांच्या एकेरीत एसएल 3 प्रकारच्या बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानच्या प्रमोद भगतने इंडोनेशियाच्या उकुन रूकाएंडीवर 21-19 15-21 21-14 अशी संघर्षपूर्ण मात करत सुवर्णपदक पटकावले, तर पॅरा शटलर तरुणने पुरुष एकेरीच्या एस एल 4 क्लासमध्ये चीनच्या युयांग गाओला 21-16 21-6 असे सरळ गेममध्ये पराभूत करत हिंदुस्थानच्या खात्यात अजून एका सुवर्णपदकाची भर घातली.

चीनने 172 सुवर्ण 88 रौप्य आणि 59 कास्यपदकांची कमाई करत पदक तालिकेत अग्रस्थान पटकावले. तसेच दक्षिण कोरियाने (53 सुवर्ण, 25 रौप्य, आणि 47 कास्य) आणि इराणने (51 सुवर्ण, 42 रौप्य, आणि 43 कांस्य) अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.