… तर लॉकडाऊन लागणार नाही! अस्लम शेख यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन राज्य सरकार वारंवार करीत आहे, पण तरीही लोक ऐकत नाहीत. त्यामुळे राज्यात आणि मुंबईत लॉकडाऊन हवा की नको हे लोकांच्या हातात आहे. लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन लागू होणार नाही, असे मुंबई शहराचे अस्लम शेख यांनी आज स्पष्ट केले.

मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागणार अशी जोरदार चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अस्लम शेख यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. लोकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे वारंवार राज्यातील जनतेला करीत आहेत, पण लोक ऐकत नाहीत. लोकांनी नाहकची गर्दी कमी केली नाही तर रात्री जमावबंदीचे जे नियम लागू केले आहे तेच नियम सकाळी लागू करावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

गर्दी टाळण्यासाठी नियोजन

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योजण्यात येणाऱया उपाययोजनांबाबत टास्क फोर्स काम करीत आहे असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. लॉकडाऊनच्या भीतीने मंडया, दुकानांमध्ये तसेच रेल्वे स्टेशनवर होणारी गर्दी टाळण्यासाठी कोणते उपाय योजावेत याची आखणी सुरू असल्याचे ते म्हणाले.