
सामना ऑनलाईन, मुंबई
अंधेरी येथे ३ जुलै रोजी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांचे अखेर निधन झाले. त्या ३५ वर्षांच्या होत्या. चार दिवसांपासून कूपर रुग्णालयात अस्मिता मृत्युशी झुंज देत होत्या. अखेर शनिवारी ६.३२ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी अंधेरी स्थानकाजवळील गोखले पूल कोसळून अपघात झाला होता. या अपघातात अंधेरीतील दळवी चाळीत राहणाऱ्या अस्मिता काटकर गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या हाताला आणि डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
काटकर आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गोखले पुलाचा वापर करत. ३ जुलै रोजी झालेल्या अपघातात त्या पुलाच्या ढिगार्याखाली अडकल्या. खूप उशीर होऊनही अस्मिता जेव्हा घरी परतल्या नाही तेव्हा घरच्यांना त्यांची चिंता वाटली. त्यांनी टीव्हीवर पुलाच्या अपघाताची बातमी पाहिली. या अपघातात त्या फसल्याची शंका त्यांनी वाटली आणि त्यांचा भाऊ संजय गवस घटनास्थळी पोहोचले. गवस यांनी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या अधिकार्यांना ही शंका वर्तवली आणि काटकर यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
अस्मिता काटकर मूळच्या सावंतवाडीच्या असून त्या घर चालवण्यासाठी पोळ्या लाटण्याचे काम करत होत्या. त्यांचे पती एका शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. काटकर दांपत्याला ६ वर्षांचा मुलगा आहे. यालाच शाळेत सोडण्यासाठी काटकर अंधेरीला गेल्या होत्या. अपघातावेळी अस्मिता काटकर १६ फूटांवरून खाली कोसळल्या. त्यांच्या चेहर्याला, डाव्या हाताला आणि डोक्याला गंभीर इजा झाली होत्या. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काटकर गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटवर होत्या. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. शेवटच्या एका तासात त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्या उपचारांनाही साथ देत नव्हत्या. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. काटकर यांचे शवविच्छेदन केल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असे कूपरच्या डॉक्टरांनी सांगितले.

























































