
- अस्मिता येंडे
लेखक गोपाळ गोसावी लिखित ‘धारावी ते…’ हे आत्मचरित्र म्हणजे कठोर मेहनत, जिद्द आणि संघर्षाची कहाणी आहे. जीवनात पावलोपावली आलेल्या अडचणींना धिराने तोंड देत आपल्या स्वप्नपूर्तीसाठी दिवसरात्र मेहनत करून आपले ध्येय साध्य करणाऱया लेखक गोपाळ गोसावी यांचा जीवनप्रवास विलक्षण आणि तितकाच प्रेरणादायी आहे. धारावी ते ठाणे यामधील प्रवास कसा घडत गेला, याचं चित्रण या आत्मचरित्रात सामावलेलं आहे. शारदा प्रकाशनाने हे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे.
‘धारावी ते’ आत्मचरित्र 7 प्रकरणांत विभागलेले असले तरी ते परिपूर्ण वाटते. साधी-सोपी निवेदनशैली, प्रवाही भाषा, रचना यामुळे हे आत्मचरित्र वाचताना वाचक त्यात गुंतून जातो. त्यातील प्रत्येक घटकाशी तादात्म्य पावतो, हेच लेखकाच्या लेखणीचे यश आहे. आत्मचरित्राचा प्रवास भूतकाळ-वर्तमानकाळ असा घडत जातो. लेखकाचा जन्म कोकणातील खेड़य़ात झाल्यामुळे कोकणातील जनजीवनाचे दर्शन यात घडते. तेथील वातावरण, निसर्गसौंदर्य, राहणीमान, खाद्यसंस्कृती, बोलीभाषेतील गोड़वा पुस्तक वाचताना अनुभवायला मिळतो. लेखकाचे बालपण, मित्र- मंडळी, आईसोबतच्या आठवणी, कोकणातील सण-उत्सवातील गमतीजमती, गोतावळा, रुढ़ी-परंपरा त्यांचं चित्रण अगदी बारकाईने आणि विस्तृतपणे केलेले आहे.
पुढील प्रकरणात गोसावी यांनी धारावीतील वास्तव्य, तेथील राहणीमान, घरांचे वर्णन, तेव्हाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती यांचे वास्तववादी वर्णन केले आहे. मुंबईवर ओढवलेलं संकट, मिल कामगारांची दयनीय अवस्था आपल्याला भूतकाळात घेऊन जाते. लेखक आपल्या आजारपणाची, त्यातून बाहेर पडून आयुष्य जिद्दीने जगण्याची आशा निर्माण करतो आणि पुढे मार्गक्रमण करतो. लेखकांचे वडील हे कोकणातील सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत होते. त्यांच्याच कलेचा वारसा लेखकाला मिळाला. ‘माझा नाटय़प्रवास’मधून एक हौशी, महत्त्वाकांक्षी कलावंत तसेच लेखक, दिग्दर्शक असे विविध गुणविशेष लाभलेले लेखक वाचकांना भेटतात.
कमी वयात लग्न झाल्यामुळे आलेल्या जबाबदाऱया, घरची परिस्थिती, कलेची आवड़, त्यात नोकरी मिळवण्यासाठीची धडपड, या सगळ्यात पत्नीची मिळालेली साथ, मुलांचा समजूतदारपणा या सगळ्या भावना लेखकाने संयतपणे व्यक्त केल्या आहेत. लेखकाच्या संयमी, महत्त्वाकांक्षी, जिद्द, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा हेवा वाटतो. ‘माझे कुटुंब’ प्रकरणातून आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे थोडक्यात व्यक्तिचित्रण लेखकाने केले आहे. या प्रवासात आपल्या कुटुंबीयांची मिळालेली साथ आणि पाठिंबा यांची पुरेपूर जाणीव त्यांना आहे. शांत, संयमी, कुटुंबवत्सल, मेहनती, महत्त्वाकांक्षी ही स्वभाववैशिष्टय़े असणारे व्यक्तिमत्त्व गोपाळ गोसावी यांचा प्रवास प्रेरक आहे.
धारावी ते…
लेखक ः गोपाळ गोसावी
प्रकाशक ः शारदा प्रकाशन
पृष्ठs ः 150



























































