अपात्रतेबाबत निर्णयास विलंब!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ म्हणजे वाजवी कालावधी (रिझनेबल टाइम) दिला जाईल. आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेताना कोणतीही घाई करणार नाही. याचिकेवरील सुनावणी ही एक मोठी प्रक्रिया आहे. त्यासाठी नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार संबंधितांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. आपली बाजू मांडण्यासाठी काहींनी वेळ मागून घेतला आहे, असे स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णयास विलंब लागणार असल्याचे संकेत आज दिले.

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवडय़ात निर्णय दिला. या पार्श्वभूमीवर लंडनच्या दौऱयावरून मुंबईत परतल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमदार अपात्रतेच्या बाबत नियम, घटनेतील तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना याआधारे निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील या प्रकरणात सर्वप्रथम राजकीय पक्ष कुणाचा आहे याचा निर्णय होणे आवश्यक आहे. भरत गोगावले आणि सुनील प्रभू हे प्रतोद कोणाचे प्रतिनिधित्व करतात आणि तो राजकीय पक्ष नेमका कुणाचा हे स्पष्ट झाल्यावर पुढील प्रक्रिया सुरू होईल, असे राहुल नार्वेकर म्हणाले

आमदार अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी 15 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे याकडे लक्ष वेधले असता, मागण्या सर्व जण करत असतात, पण कायद्यानुसार काही तरतुदी आहेत. इतरही काही कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. आपल्याला निर्णय घेण्यासाठी घाई करायची नाही आणि विलंबही करायचा नाही. जो निर्णय होईल तो निर्णय संविधानातील तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेतला जाईल. हा निर्णय कुणाच्या मनाप्रमाणे किंवा कुणाच्या बाजूने होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.