विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तब्बल 55 वर्षांनी मुंबईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vidhanbhavan

सामना प्रतिनिधी । मुंबई

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तब्बल 55 वर्षांनी मुंबईत होत आहे. हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याची परंपरा यंदा खंडित झाली असून 19 ते 30 नोव्हेंबर या काळात हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरचे होणारे हे मुंबईतील चौथे अधिवेशन असेल. या अधिवेशनात प्रत्यक्ष कामकाजाचे नऊच दिवस असल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीका केला आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरमध्ये घेण्याची परंपरा आहे, पण यंदा पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित केल्याने हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत होत आहे. यापूर्वी 1963 मध्ये मुंबईत हिवाळी अधिवेशन झाले होते. त्यानंतर आता 55 वर्षांनी मुंबईत हिवाळी अधिवेशन होणार आहे.

विधानसभा व विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधान भवनात झाली. त्यानंतर संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी कामकाजाची माहिती दिली. 19 नोव्हेंबरपासून सुरू होणारे अधिवेशनाचे कामकाज 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. पहिल्या आठवडय़ातील शनिवार-रविवार व 21 नोव्हेंबर रोजी ईदची सुट्टी पाहता अधिवेशनाचे कामकाज केवळ नऊ दिवस चालणार आहे. या अधिवेशनात विधानसभेत प्रलंबित असलेली आठ तर विधान परिषदेची दोन प्रलंबित विधेयके मांडण्यात येतील. दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर या अधिवेशनात महत्त्वपूर्ण चर्चा होईल, असेही ते म्हणाले.

कालावधी वाढवण्याची मागणी
मुंबईचा विकास आराखडा व राज्यातील इतर नागरी समस्यांवर विरोधी पक्षांना सभागृहात चर्चा करायची आहे. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी किमान एका आठवडय़ाने वाढवून तीन आठवडय़ांचा करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

मुंबईतील यापूर्वीच्या हिवाळी अधिवेशनांचे वर्ष व कालावधी
1939 – 27 सप्टेंबर ते 31 नोव्हेंबर 1939
1946 – 11 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 1946
1953 – 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर 1953
1955 – 18 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 1955
1956 – 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 1956
1957 – 10 डिसेंबर ते 26 डिसेंबर 1957
1959 – 30 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर 1959

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरची अधिवेशन
1961 – 30 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 1961
1962 – 19 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 1962
1963 – 9 डिसेंबर ते 20 डिसेंबर 1963