टेक्सास किनाऱ्याजवळ मेक्सिकन नौदलाचं विमान कोसळलं; 5 जणांचा मृत्यू, 2 जण बचावले, एक बेपत्ता

आगीत होरपळलेल्या मुलाला उपचारांसाठी घेऊन जाणारे मेक्सिकन नौदलाचे विमान सोमवारी दुपारी टेक्सासच्या किनारपट्टीवर गॅल्व्हेस्टन जवळ कोसळले. या भीषण अपघातामध्ये नौदल अधिकाऱ्यांसह 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण बचावले आहेत, तर एक जण बेपत्ता आले. अल जझीराने याबाबत वृत्त दिले आहे.

मेक्सिकन नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानामध्ये चार नौदल अधिकारी आणि चार सामान्य नागरीक होते. यात एका गंभीर भाजलेल्या मुलाचाही समावेश होता. हे विमान ‘मिशू आणि माऊ फाऊंडेशन’ या संस्थेच्या मदतीने भाजलेल्या मुलाला उपचारांसाठी गॅल्व्हेस्टन येथील श्राइनर्स चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. मात्र दुपारी तीनच्या सुमारास (हिंदुस्थानी वेळेनुसार) ह्युस्टनपासून सुमारे 50 मैल दूर असलेल्या टेक्सासच्या किनारपट्टीवर गॅल्व्हेस्टन जवळ कोसळले.

विमान कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह कोस्टल गार्डने शोधमोहीम सुरू केली. घटनास्थळापासून काही अंतरावर राहणारे उद्योजक याट कॅप्टन स्काय डेकर यांनीही स्वत:च्या बोटीने बचाव कार्यात मदत केली. डेकर यांनी स्वत: एका मृत व्यक्तीला विमानातून बाहेर काढले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोघे बचावले आहेत, तर एक जण बेपत्ता आहे.

दाट धुक्यामुळे अपघात?

गॅलव्हेस्टन बेटाला जोडणाऱ्या पुलाजवळ हा अपघात झाला असून या भागात दाट धुके होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अपघातावेळी दृश्यमानता खूपच कमी होती. यामुळे हा अपघात झाला असा प्राथमिक अंदाज आहे. स्काय डेकर यांनीही धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती असे सांगितले. अपघातानंतर विमान पूर्णपणे बुडाले होते. डेकर यांनी एका महिलेला पाण्यातून बाहेर काढले, तर एक मृतदेहही त्यांनी विमानातून बाहेर काढला.

तपास सुरू

दरम्यान, मेक्सिकोच्या नौदल दलाने घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेची फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) या संस्था या अपघाताचा सखोल तपास करत आहेत.